

पँक्रियाज म्हणजेच स्वादुपिंड हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. पचन आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे अशा महत्त्वाच्या कार्याशी स्वादुपिंड निगडित असते. त्यामुळे हा अवयव निरोगी ठेवणे अतिशय महत्त्वाचे ठरते. स्वादुपिंडातील समस्यांमुळे मधुमेह व पँक्रियाटायटिससारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. योग्य आहारातून आपण स्वादुपिंडाच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो, असे आहारतज्ज्ञ सांगतात. त्यासाठी ‘हे’ गुणकारी आहे...
ब्लूबेरी : ब्लूबेरी या अँटिऑक्सिडंटस्ने संपन्न असतात. अँटिऑक्सिडंटस् हे फ्री रॅडिकल्सना नष्ट करण्यात मदत करतात आणि स्वादुपिंडाचे आरोग्य चांगले राहते. ब्लूबेरीमध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असते ज्यामुळे पचनसंस्थेला लाभ होतो व स्वादुपिंडाचे कार्यही सुधारते.
दही : दह्याचे सेवनही स्वादुपिंडासाठी लाभदायक ठरते. दही हे प्रोबायोटिक्स म्हणजेच आरोग्यदायी जीवाणुंचा चांगला स्रोत आहे. त्याच्यामुळे पचनसंस्था चांगली राहते आणि स्वादुपिंडाचे कार्यही सुधारते. दह्यातील चांगले जीवाणू स्वादुपिंडाचे आरोग्य सुधारतात आणि त्याला हानीकारक संक्रमणापासून बचावतात.
लसूण : लसणातही अँटिऑक्सिडंटस् आणि अँटि-इन्फ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे लसणाच्या सेवनानेही स्वादुपिंडाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. लसणाच्या नियमित सेवनाने स्वादुपिंडाची सूज कमी होते व त्याची कार्यप्रणाली सुधारते.
पालक : या भाजीत व्हिटॅमिन के, सी आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे स्वादुपिंडाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. पालकच्या नियमित सेवनाने स्वादुपिंडाचे कार्य सुधारते व त्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते.
रताळे : रताळेही स्वादुपिंडासाठी गुणकारी असतात. रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी चांगल्या प्रमाणात असते. रताळ्यातील फायबर पचन सुधारते तसेच स्वादुपिंडावरील ताण कमी करते.