

नवी दिल्ली : भारतामध्ये चित्त्यांचे पुनरागमन होऊन चार वर्षे पूर्ण झाली असून, सध्या देशात चित्त्यांची एकूण संख्या ५२ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, यातील ३२ चित्त्यांचा जन्म भारताच्या भूमीवर झाला आहे. ‘प्रोजेक्ट चित्ता’च्या ताज्या आढावा अहवालानुसार, आफ्रिकेतून चित्ते आणण्यापासून सुरू झालेला हा प्रकल्प आता भारतातच त्यांचे प्रजनन घडवून आणणे आणि त्यांना खुल्या अधिवासात सोडण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
१७ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांना सोडून या प्रकल्पाचा शुभारंभ केला होता. त्यानंतर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणि २०२६ मध्ये बोत्सवाना येथून आणखी चित्ते आणण्यात आले. सध्या भारतातील ५२ चित्त्यांपैकी ४९ चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये, तर ३ चित्ते मध्य प्रदेशातीलच गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात आहेत. या प्रकल्पात प्रजननाने मोठी भूमिका बजावली आहे.
आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांनी भारतातील वातावरणात यशस्वीरीत्या प्रजनन केले असून, सध्या भारतात जन्मलेले ३२ चित्ते सुखरूप आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये भारतात जन्मलेल्या ‘मुखी’ या मादी चित्त्याने ५ बछड्यांना जन्म दिला. त्यानंतर एप्रिल २०२६ मध्ये ‘KGP12’ या २४ महिने वयाच्या मादी चित्त्याने कुनोच्या जंगलात ४ बछड्यांना जन्म दिला. भारतीय भूमीवर जन्मलेल्या मादीने मोकळ्या जंगलात बछड्यांना जन्म देण्याची ही पहिलीच वेळ होती. हा प्रकल्प आता केवळ एकाच जंगलापुरता मर्यादित राहिलेला नाही. कुनोमधील ४९ चित्त्यांपैकी १७ चित्ते सध्या मोकळ्या जंगलात वावरत आहेत, तर उर्वरित चित्ते (ज्यात १ वर्षांपेक्षा कमी वयाची १९ बछडे समाविष्ट आहेत) विशेष कुंपणात आहेत.