

लंडन : प्रक्रिया केलेल्या मांसातील नायट्राईटस्मुळे आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मांसाच्या पॅकवर कर्करोगाचा इशारा देणारी लेबल लावण्याची मागणी शास्त्रज्ञांनी केली आहे. ब्रिटनमध्ये बॅकॉन आणि हॅम हे डुकराच्या मांसाचे दोन प्रक्रिया केलेले लोकप्रिय प्रकार आहेत. प्रक्रिया करताना या मांसात नायट्राईटस्चा वापर केला जातो. नायट्राईटस् मानवी आरोग्यासाठी घातक आहे. त्याच्यामुळे निर्माण होणार्या धोक्याकडे शास्त्रज्ञांनी लक्ष वेधले असून, सिगारेटप्रमाणे या कंपन्यांच्या पॅकवरही कर्करोगाचा धोका, असे लेबल लावण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) एका दशकापूर्वीच्या इशार्यानंतरही ब्रिटनच्या सरकारने कोणताही ठोस उपाय केला नसल्यामुळे शास्त्रज्ञांनी चिंता आणि नाराजी व्यक्त केली आहे.
नायट्राईटस् म्हणजे काय आणि त्याचा धोका काय?
नायट्राईटस् ही रासायनिक संयुगे आहेत. बॅकॉन आणि हॅम या दोन्ही प्रकारच्या मांसाला गुलाबी रंग देण्यासाठी वापरले जाते. तसेच मांस दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी प्रक्रिया करताना नायट्राईटस् मिसळली जातात. शास्त्रज्ञांच्या मते, हे नायट्राईटस् शरीरात नायट्रोसामाईन्स नावाचे संयुगे तयार करतात, जे कर्करोग वाढवतात. ऑक्टोबर 2015 मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेच्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर या संस्थेने प्रक्रिया केलेले मांस हे मानवांसाठी कर्करोगजन्य असल्याचे जाहीर केले होते आणि त्याला तंबाखू आणि अॅस्बेस्टॉससारख्याच श्रेणीत ठेवले होते.
शास्त्रज्ञांची मागणी
शास्त्रज्ञांनी ब्रिटनचे आरोग्य सचिव वेस स्ट्रीटिन्ग यांना पत्र लिहून मागणी केली आहे की, नायट्राईटस् असलेल्या बॅकॉन आणि हॅमच्या 90 टक्के ते 95 टक्के पॅकेटस्वर सिगारेटप्रमाणे सक्तीचे इशारा, चेतावणी देणारी लेबल्स लावावीत. तसेच, अन्न उत्पादकांना येत्या काही वर्षांत प्रक्रिया केलेल्या मांसातून नायट्राईटस्चा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा आदेश द्यावा.
54 हजार ब्रिटिश नागरिकांना आतड्यांचा कर्करोग
जागतिक आरोग्य संघटनेच्या इशार्यानंतर दशकभरातील निष्क्रियतेमुळे ब्रिटनमधील तब्बल 54,000 नागरिकांना आतड्यांचा कर्करोग झाला असून, त्यांच्यावर आरोग्य उपचार करण्यासाठी ब्रिटिनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवाविभागाचा आतापर्यंत 3 अब्ज पाऊंड इतका खर्च झाला असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. जगातिक आरोग्य संघटनेच्या 2015 मधील विश्लेषणानुसार, दररोज 50 ग्रॅम प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्यास आतड्यांच्या कर्करोगाचा धोका सुमारे 18 टक्क्यांनी वाढतो.
तज्ज्ञ प्रो. डेनिस कॉर्पेट म्हणतात, नायट्राईट-क्युअर केलेले मांस तंबाखू आणि अॅस्बेस्टॉसच्या समान कर्करोगजन्य श्रेणीत येते, याची बहुतेक लोकांना कल्पना नाही. ‘ग्राहकांना स्पष्ट माहिती मिळायलाच हवी. सिगारेटवर धुम्रपान करणे जीवघेणे आहे असे जसे लेबल असते, तसे इथेही आवश्यक आहे. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडने लेबलांच्या मागणीला पाठिंबा दिला नसला, तरी त्यांनी प्रक्रिया केलेले मांस मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला आहे.