

वॉशिंग्टन : अवघे शहर उद्ध्वस्त करू शकेल, अशा लघुग्रहाबद्दल नासाने आणखी एक मोठे अपडेट दिले असून यानुसार 2032 मध्ये पृथ्वीवर त्याचा आक्रमण होण्याची शक्यता नगण्य झाली आहे. 2024 वायआर 4 असे या लघुग्रहाचे नाव असून सात-एक वर्षांनंतर पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी त्याची धडक होण्याची शक्यता वर्तवली गेली होती; मात्र आता नासाने ही शक्यता बरीच घटली असल्याचे म्हटले आहे.
नासाच्या सेंट्री इम्पॅक्ट मॉनिटरिंग सिस्टीमनुसार, 2024 वायआर 4 या लघुग्रहाने पृथ्वीवर 22 डिसेंबर 2032 रोजी आदळण्याची शक्यता 26 हजार प्रसंगात फक्त एकदा, इतकी कमी झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. लघुग्रह पृथ्वीजवळून पुढे जाईल. पण, त्यामुळे, पृथ्वीला किंचितही हानी पोहोचणार नाही. या लघुग्रहापासून असलेला धोका लक्षात आल्यानंतर तो टाळता कसा येईल, यासंदर्भात काही संस्था-संघटनांनी विचारविनिमय सुरू केला होता. त्यांच्यासाठी देखील ही दिलासादायक बाब आहे, असा दावा नासाने म्हटले आहे.
नासाने ही महत्त्वाची अपडेट देण्यापूर्वी 2024 वायआर 4 या लघुग्रहाचा पृथ्वीवर आदळण्याची शक्यता 3.1% पर्यंत पोहोचली होती, हे देखील येथे उल्लेखनीय आहे. आतापर्यंतचा सर्वात धोकादायक लघुग्रह, असे याचे वर्णन त्यावेळी केले गेले होते. टोरेनो स्केलवर या लघुग्रहाचे रेटिंग 3 इतके निश्चित केले गेले होते. गतवर्षी डिसेंबरमध्ये या लघुग्रहाची ओळख निश्चित करण्यात आली होती. 54 मीटर (177 फूट) व्यासाच्या या लघुग्रहाच्या आदळण्यामुळे गंभीर विध्वंस होण्याची भीती होती. हा लघुग्रह ट्राफल्गार स्क्वेअरमध्ये असलेल्या नेल्सन कॉलमच्या पेक्षा थोडा उंच आहे, असेही अभ्यासकांनी यापूर्वी नमूद केले होते.