नवी दिल्ली : भारतात आता खासगी कंपन्याही रॉकेट लाँच करू शकतील. सरकारची परवानगी कंपन्या घेऊन देशात व बाहेर रॉकेट लाँच साईट तयार करून तेथून रॉकेटचे प्रक्षेपण करू शकतील. तसेच भारताची अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो'साठीही लाँच साईट तयार करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी 'इस्रो'ने आपल्या नव्या अंतराळ धोरणाचा ड्राफ्ट जारी केला आहे.
'इस्रो'चे पहिले आणि एकमेव प्रक्षेपण केंद्र आंध— प्रदेशात श्रीहरिकोटा येथे असून, त्याचे नाव 'सतीश धवन स्पेस सेंटर' असे आहे. आता असेच दुसरे स्पेस सेंटर तामिळनाडूत कुलशेखरपट्टिनमजवळील थुथूकुडी येथे तयार केले जात आहे. त्यासाठी 'इस्रो' खासगी कंपन्यांना संधी देऊ इच्छिते. नव्या धोरणांच्या या ड्राफ्टमध्ये म्हटले आहे की, कंपन्यांना 'इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायजेशन सेंटर' (इन-स्पेस) कडून परवानगी घ्यावी लागेल. हा 'इस्रो'चाच एक भाग असून, स्वायत्तपणे काम करतो. अलीकडेच अंतराळ क्षेत्रातील कामांच्या संचालनासाठी त्याची स्थापना करण्यात आली आहे. 'डिपार्टमेंट ऑफ स्पेस'चे प्रमुख सिवन यांनी सांगितले की, खासगी कंपन्या 'इस्रो'बरोबर भागीदारी करू शकतात. अंतराळ वाहतुकीमधील भविष्यातील योजनांचा खासगी कंपन्याही हिस्सा बनू शकतात. खासगी कंपन्या लाँच व्हेईकल बनवणे व लाँच करणे याशिवाय लाँच साईट बनवण्याचेही कार्य करू शकतात.