

नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) टूल्सच्या माध्यमातून विविध प्रकारची कामे करणे सोपे होऊ लागले आहे; पण याचवेळी प्रायव्हसीची (गोपनीयता) चिंता सतावू लागली आहे. कारण, हे एआयचे टूल्स वापरकर्त्यांच्या चॅटमधूनच शिकत असतात. यावर उपाय म्हणून, एन्क्रिप्टेड ई-मेल सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रोटॉन कंपनीने ‘लुमो’ नावाचा एक नवा एआय चॅटबॉट सादर केला आहे. चॅट जीपीटी, जेमिनी आणि कोपायलट यांसारख्या चॅटबॉटस्ना पर्याय म्हणून लुमोचा चॅटबॉट वापरकर्त्याच्या अर्थात यूझरच्या गोपनीयतेची संपूर्ण हमी देणार आहे.
लुमो कोड तयार करणे, ई-मेल लिहिणे, डॉक्युमेंटस्चा सारांश बनवणे अशी अनेक कामे करू शकतो. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे ‘झिरो-अॅक्सेस एन्क्रिप्शन’ तंत्रज्ञान. यामुळे यूझरच्या परवानगीशिवाय स्वतः प्रोटॉन कंपनीसुद्धा तुमचा डेटा पाहू शकत नाही. सर्व डेटा यूझरच्या डिव्हाईसवरच सुरक्षित राहतो. लुमो युरोपमधील प्रोटॉनच्या सर्व्हरवर चालणार्या मिस्ट्रल आणि एनव्हिडियासारख्या अनेक ओपन-सोर्स लँग्वेज मॉडेल्सचा वापर करतो.
घोस्ट मोड : या मोडमध्ये तुमचे चॅट सेशन कुठेही, अगदी तुमच्या डिव्हाईसवरही सेव्ह होत नाही.
वेब सर्च : गरजेनुसार इंटरनेटवरून माहिती शोधण्यासाठी हा पर्याय आहे, जो प्रायव्हसीसाठी डिफॉल्टनुसार बंद असतो.
प्रोटॉन ड्राईव्ह इंटिग्रेशन : तुम्ही तुमच्या प्रोटॉन ड्राईव्हमधील एन्क्रिप्टेड फाईल्स थेट चॅटमध्ये वापरू शकता.
ज्या यूझर्सकडे प्रोटॉनचे अकाऊंट नाही, ते आठवड्यातून 25 प्रश्न विचारू शकतात. फ्री-अकाऊंट धारकांना 100 प्रश्नांची मर्यादा आहे, तर ‘लुमो प्लस’ या पेड योजनेत अमर्याद चॅटस् आणि एन्क्रिप्टेड चॅट हिस्ट्रीसारख्या अनेक प्रगत सुविधा मिळतात. यामुळे आता यूझर्सना एआयच्या क्षमतेसोबतच गोपनीयतेची सुरक्षाही मिळणार आहे.