Prince Harry Latest News | प्रिन्स हॅरी आणि मेगन पुन्हा ब्रिटनला परतणार

मुलांचे शाळा प्रवेश आणि कौटुंबिक समेटाची चर्चा
 Prince Harry Latest News |
Prince Harry Latest News | प्रिन्स हॅरी आणि मेगन पुन्हा ब्रिटनला परतणार
Published on
Updated on

लंडन : प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल यांनी आपल्या राजेशाही जबाबदाऱ्यांमधून मुक्त होत अमेरिका गाठल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी, ते या महिन्यात पुन्हा ब्रिटनमध्ये परतण्याची योजना आखत आहेत. एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. ‘पीपल’ मॅगझिन आणि ब्रिटिश वृत्तपत्र ‘द टेलिग्राफ’च्या रिपोर्टनुसार, ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स आपल्या ७ वर्षांचा मुलगा प्रिन्स आर्ची आणि ५ वर्षांची मुलगी प्रिन्सेस लिलिबेटसह कॅलिफोर्नियाहून ब्रिटनला जात आहेत. त्यांची मुले सप्टेंबरपासून तेथील शाळेत जाण्यास सुरुवात करतील. यावर हॅरी यांच्या प्रवक्त्याने किंवा बकिंगहॅम पॅलेसने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही; मात्र, या दांपत्याच्या जवळच्या एका सूत्राने या बातमीला दुजोरा दिला आहे.

‘द टेलिग्राफ’नुसार, हे दांपत्य कोणत्याही शाही राजवाड्यात राहणार नाही. मार्च २०२० मध्ये राजेशाही जबाबदाऱ्या सोडताना दिवंगत राणी एलिझाबेथ यांच्यासोबत ठरल्यानुसार, ते ‘नॉन-वर्किंग रॉयल्स’ (राजेशाही कामकाज न करणारे सदस्य) म्हणूनच राहतील. हॅरी यांनी २०१८ मध्ये विंडसर कॅसल येथे एका सोहळ्यात मेगन मार्कलशी विवाह केला होता. विवाहानंतर लवकरच शाही घराण्यातील इतर सदस्यांशी त्यांचे मतभेद सुरू झाले. दोन वर्षांनंतर, मार्च २०२० मध्ये त्यांनी आपल्या अधिकृत जबाबदाऱ्यांमधून बाहेर पडून अमेरिकेत स्थायिक होण्याची घोषणा केली. त्यानंतर ते कॅलिफोर्नियातील सांता बार्बरा येथील ‘मॉन्टेसिटो’ या आलिशान भागात स्थायिक झाले. मीडिया रिपोर्टस्‌नुसार, २०२० मध्ये त्यांच्या १६ बेडरूमच्या घराची किंमत १४.७ दशलक्ष डॉलर (सुमारे १४७ लाख डॉलर) होती. पुढील काही वर्षांत हॅरी (वय ४१) आणि मेगन (४५) यांनी टीव्ही मुलाखती, नेटफ्लिक्सची डॉक्युमेंट्री सीरिज आणि विशेषतः हॅरी यांच्या ‘स्पेयर’ या पुस्तकातून ब्रिटिश राजेशाही आणि शाही घराण्यावर जोरदार टीका केली.

२०२१ मध्ये ओप्रा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीत मेगनने खुलासा केला होता की, कुटुंबातील एका सदस्याने त्यांच्या होणाऱ्या बाळाच्या (आर्ची) त्वचेचा रंग काळा असेल का, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर हॅरी यांचे मोठे भाऊ आणि राजगादीचे वारसदार प्रिन्स विल्यम यांनी ब्रिटनचे शाही घराणे वर्णद्वेषी नसल्याचे सांगत हे दावे फेटाळून लावले होते. हॅरी यांनी आपले वडील किंग चार्ल्स आणि भाऊ प्रिन्स विल्यम यांच्याबद्दल काही अत्यंत तिखट टिप्पणी केल्यामुळे त्यांच्यातील संबंध पूर्णपणे ताणले गेले होते. तसेच, ब्रिटिश सरकारने त्यांची विशेष सुरक्षा व्यवस्था हटवल्यामुळे हॅरी नाराज होते आणि ऑटोमॅटिक पोलिस सुरक्षा नसल्यामुळे ते आपल्या मुलांना ब्रिटनमध्ये आणू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

मात्र, कालांतराने राजा चार्ल्स यांच्यासोबतच्या संबंधांमध्ये सुधारणा दिसून आली आणि २० महिन्यांनंतर प्रथमच पिता-पुत्राची छोटी भेट झाली. २०२४ मध्ये किंग चार्ल्स यांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये टेलिव्हिजनवर घोषणा केली होती की, उपचारांचा त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम झाला असून, डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार कमी केले आहेत. गेल्या महिन्यात हॅरी, मेगन आणि त्यांची मुले ब्रिटनला गेले होते, जिथे किंग चार्ल्स यांनी २०२२ नंतर पहिल्यांदाच आपल्या नातवंडांची भेट घेतली. हॅरी आणि राजा चार्ल्स यांच्यातील दुरावा कमी झाला असला, तरी त्यांचे मोठे भाऊ प्रिन्स विल्यम यांच्याशी बोलणे अजूनही नगण्यच आहे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news