

लंडन : पहिल्या व दुसर्या महायुद्धात अनेक लोकांचा बळी गेला होता, तसेच मोठी वित्तहानी झाली होती. गेल्या वर्षी जगाला रशिया-युक्रेन तसेच इस्रायल-हमास युद्धाची झळ लागली. 2025 या नव्या वर्षात तिसरे महायुद्ध होणार असे वेगवेगळ्या भविष्यवेत्त्यांचा संदर्भ देऊन सांगणारे (खरे तर भीती दाखवणारेच!) अनेक लोक आहेत. मात्र, असे तिसरे महायुद्ध झालेच तर त्यानंतर मनुष्यजातीचे काय होईल, ही एक विचारात घेण्यासारखी बाब आहे. याबाबत इंग्लंडच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील प्रा. टिम कॉल्सन यांनी एक भन्नाट दावा केला आहे. ते रॉयल सोसायटीतील एक नामवंत जैववैज्ञानिक आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, अणुयुद्ध अशा विकासवादी परिवर्तनाला जन्म देऊ शकते, ज्यानंतर माणसांना ओळखणे कठीण होईल. माणसाचा यामधून ‘सुपरह्युमन’ बनू शकतो. त्याची त्वचा बुलेटप्रुफ होऊ शकते आणि त्याला चक्क पंखही फुटू शकतील!
टिम कॉल्सन यांच्या म्हणण्यानुसार वैश्विक अणुयुद्धानंतर माणसामध्ये काही अनुवांशिक बदल घडू शकतात. त्यामधूनच असा ‘सुपरह्युमन’ बनू शकतो. तो आजच्या माणसाच्या तुलनेत अधिक मजबूत, तंदुरुस्त आणि लढवय्या असेल. कठोर परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच आश्रय तयार करण्यासाठी माणूस विस्मरणात गेलेले तंत्रज्ञान आणि विज्ञान यांना एकत्रित करून ‘हायपर इंटेलिजन्स’ मिळवू शकतो. त्यांचा दावा आहे की, माणसाचे शरीर आकुंचित होऊ शकते तसेच त्याला वटवाघळाप्रमाणे उडण्यासाठी पंखही असू शकतात. ‘द युरोपियन’ नियतकालिकात त्यांनी असा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मानवी स्वरुपात मोठे बदल घडण्यासाठी अर्थातच लाखो वर्षे लागू शकतात. मात्र, त्याचा प्रारंभ तिसर्या महायुद्धानंतर होऊ शकतो. भविष्यात माणूस अधिक बुद्धिमान व सामर्थ्यशाली होऊ शकतो. त्याच्यामध्ये अविश्वसनीय अशी ताकद येऊ शकते. तो वटवाघळांसारखाच उडूही शकेल. ही दूरची गोष्ट वाटत असली तरी असे घडू शकेल. कोट्यवधी वर्षांपूर्वी केवळ जेलीफिशसारखा जीव होता, त्यावेळी कुणी त्यापासून माणसासारखा प्राणी विकसित होईल याची कल्पना केली असती का? अनुवंशिक प्रक्रियेने अशा गोष्टी विकसित होत असतात. जीवांमध्ये टिकून राहण्यासाठी नव्या सुधारणा बनत असतात. पर्यावरणाची आपत्ती असो किंवा युद्ध, आजार किंवा हवामान बदल असो, या गोष्टी विकासवादी दिशेत बदल घडवू शकतात. विकास प्रक्रियेला या गोष्टी चालना देऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.