

लंडन / नवी दिल्ली : मध्ययुगीन काळातील प्रसिद्ध 'क्रूसेडस्' (ख्रिश्चन आणि मुस्लिमांमधील धर्मयुद्धे) आणि 'होर्मुझ' बेटाचा (Strait of Hormuz) इतिहास यांवर प्रकाश टाकणारा एक महत्त्वपूर्ण संशोधनपर लेख ‘हिस्ट्री टुडे’ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. लेखक जॉन अस्पिनॉल यांच्या मते, पोर्तुगीज साम्राज्याने ख्रिश्चनांचे पवित्र स्थान 'जेरुसलेम' पुन्हा जिंकण्यासाठी भूमध्य समुद्राऐवजी थेट 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' आणि अरबी समुद्राचा वापर करण्याची एक गुप्त आणि महत्त्वाकांक्षी रणनीती आखली होती.
आशियाई समुद्रावरील वर्चस्व आणि पोर्तुगीज रणनीती
१४९८ मध्ये वास्को द गामाने भारताच्या कालिकत (कोझिकोड) येथे पाऊल ठेवले आणि हिंदी महासागरात पोर्तुगीज वसाहतवादाची सुरुवात झाली. परंतु, या सागरी मार्गांवर इजिप्तच्या 'मामलुक' आणि मध्य पूर्वेतील मुस्लिम राज्यांचे वर्चस्व होते. या व्यापारी प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यासाठी पोर्तुगीज भारताचा व्हाईसरॉय अल्फांसो डी अल्बुकर्क याने एक नवीन रणनीती आखली. तांबडा समुद्र (रेड सी) आणि पर्शियन गल्फ (पर्शियन आखात) यांसारख्या मुख्य सागरी मार्गांवर ताबा मिळवून मुस्लिमांचा व्यापार रोखणे, हा यामागील मुख्य हेतू होता.
‘होर्मुझ’चा लढा आणि पोर्तुगीज ताबा
१५१२ मध्ये हर्मुझचा सुलतान सैफ अद-दिन याला त्याच्याच वजीराने विष देऊन मारले, ज्यामुळे होर्मुझ राज्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला. या राजकीय अस्थिरतेचा फायदा उठवत, एप्रिल १५१५ मध्ये अल्बुकर्कने आपल्या नौदलाच्या जोरावर होर्मुझ बेटावर तोफांचा वर्षाव केला आणि तिथल्या सत्ताधीशांना पोर्तुगालचे मांडलिक बनण्यास भाग पाडले. यामुळे पोर्तुगालला पर्शियन गल्फमधून प्रचंड कर आणि संपत्ती मिळू लागली, ती १६२२ पर्यंत (अँग्लो-पर्शियन सैन्याने त्यांना हरवेपर्यंत) सुरू राहिली.
होर्मुझ मार्गे जेरुसलेमचा मार्ग
या संशोधनातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, रोममधील एका पाद्र्याने (कॅमिलियो पोर्टी) तत्कालीन पोप लिओ १० व्या यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, ‘होर्मुझ राज्यावरील ताब्यामुळे आपल्यासाठी जेरुसलेमच्या 'होली सेपल्कर'कडे जाण्याचा एक नवीन मार्ग मोकळा झाला आहे, जेणेकरून आपण ती पवित्र भूमी पुन्हा ख्रिश्चन साम्राज्यात सामील करू शकू.’
वास्तविक पाहता, १४ व्या शतकात 'विलियम ॲडम' या फ्रेंच धर्मगुरूंनी 'हाऊ टू डिफीट द सारसेन्स' या पुस्तकात एक आराखडा मांडला होता. त्यानुसार, जेरुसलेमवर थेट भूभागावरून हल्ला करण्याऐवजी, हिंदी महासागरातून येणारा मुस्लिम देशांचा व्यापार होर्मुझ आणि तांबड्या समुद्रात रोखला जावा. यामुळे इजिप्तच्या मामलुक राजांची आर्थिक रसद तुटून ते कमकुवत होतील आणि ख्रिश्चन सैन्याला जेरुसलेम जिंकणे सोपे जाईल. अल्बुकर्कने देखील याच धोरणाचा भाग म्हणून तांबड्या समुद्रातील यानबू बंदरावर सैन्य उतरवून मक्का आणि मदिनावर ताबा मिळवण्याची आणि त्या बदल्यात जेरुसलेमची मागणी करण्याची योजना आखली होती; पण ती नंतर कधी पूर्ण होऊ शकली नाही.