

ल्युब्लियाना : युरोपातील स्लोव्हेनिया या देशाला ‘तपकिरी अस्वलांचा स्वर्ग’ मानले जाते; पण आता याच अस्वलांची वाढती संख्या तेथील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, स्लोव्हेनियामध्ये तपकिरी अस्वलांची संख्या सध्या 950 इतकी आहे, जी पुढील वर्षाच्या सुरुवातीस 1,100 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
अस्वलांच्या वाढत्या संख्येमुळे मानवी वस्तीवर वाढणारा धोका लक्षात घेऊन, त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी एक ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सुमारे 4,200 हून अधिक लोकांनी या ऑनलाईन याचिकेवर स्वाक्षरी केली आहे. या याचिकेद्वारे सरकारने तातडीने कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. या याचिकाकर्त्यांनी नैसर्गिक संसाधन आणि स्थानिक नियोजन मंत्रालयाला सन 2025-2026 साठी निर्धारित केलेल्या 206 अस्वलांच्या शिकारीचा कोटा वाढवण्याची मागणी केली आहे.
याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, अस्वलांची वाढती संख्या ग्रामीण भागातील मानवी सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण करत आहे. या याचिकेची सुरुवात करणारे गोराझ्ड कोवासिक यांनी सांगितले की, त्यांची याचिका ‘राकितना’ गावातून सुरू झाली. हे गाव यावर्षी मानव-अस्वल संघर्षांमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या क्षेत्रांपैकी एक आहे. कोवासिक म्हणाले, ‘ही याचिका अस्वलांच्या लोकसंख्येवर लक्ष ठेवणार्या तज्ज्ञांच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. राकितनामध्ये अस्वल जवळजवळ दररोज दिसतात आणि आता त्यांच्या मनात माणसांची भीती राहिलेली नाही.’
ल्युब्लियाना विद्यापीठातील बायो-टेक फॅकल्टीचे संशोधक टोमाज स्क्रबिन्सेक यांच्या मते, स्लोव्हेनियामध्ये जगात सर्वाधिक अस्वलांची लोकसंख्या घनता आहे. काही भागात तर दर 100 चौरस किलोमीटरमध्ये 50 हून अधिक अस्वल आढळतात. जरी पर्यावरण गट स्लोव्हेनियाला अस्वलांचे स्वर्ग मानत असले आणि गेल्या अनेक दशकांपासून अस्वलांच्या हल्ल्यात एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसला, तरी आता स्थानिक लोक त्यांच्या वाढत्या संख्येमुळे त्रस्त आहेत. तपकिरी अस्वल ही स्लोव्हेनियाची एक संरक्षित प्रजाती आहे. स्लोव्हेनियाचा 60 टक्के भूभाग जंगलाने व्यापलेला असून, अस्वलांचे संरक्षण येथे महत्त्वाचे मानले जाते.
पर्यावरणामध्ये ‘शिकारी’ म्हणून ते इतर प्राण्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवतात आणि बियाणे पसरवून पर्यावरण वाचविण्यातही मदत करतात. परंतु, आता त्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवणे मानवी सुरक्षेसाठी आवश्यक बनले आहे.