

नवी दिल्ली : तुम्हालाही समोसे, वडा, भजी, चिप्स किंवा फ्रेंच फ्राईजसारखे तळलेले पदार्थ खाण्याची आवड आहे का? जर असेल, तर हा छंद तुमची ‘एंग्जायटी’ म्हणजेच चिंता, घबराट आणि अस्वस्थता वाढवू शकतो. जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाल्ल्याने केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होतात, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
तळलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट, रिफाईंड कार्बोहायड्रेटस् आणि ऑक्सिडाइज्ड ऑईलचे प्रमाण जास्त असते. याचे नियमित सेवन केल्याने शरीरात ‘क्रॉनिक इंफ्लेमेशन’ म्हणजेच अंतर्गत सूज वाढते. ही सूज मेंदूतील ‘सेरोटोनिन’ आणि ‘डोपामाइन’ सारख्या रसायनांचे संतुलन बिघडवते. ही रसायने आपला मूड आणि भावनिक स्थिरता नियंत्रित करण्याचे काम करतात. तळलेले पदार्थ आपल्या आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांचे नुकसान करतात. शरीरातील जवळजवळ 90 टक्के सेरोटोनिन हे आतड्यांमध्ये तयार होते. त्यामुळे जेव्हा आतड्यांचे आरोग्य बिघडते, तेव्हा चिंता वाढण्याची शक्यता अधिक असते.
वैद्यकीय भाषेत याला ‘गट-ब्रेन अॅक्सिस इम्बॅलन्स’ असे म्हणतात. तळलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते आणि नंतर अचानक खाली येते. यामुळे चिडचिडेपणा, अस्वस्थता आणि घबराट यांसारखी लक्षणे जाणवू शकतात. अति प्रमाणात तळलेले पदार्थ खाल्ल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. तळलेल्या पदार्थांऐवजी भाजलेले, वाफवलेले पदार्थ किंवा मोड आलेले कडधान्ये खाण्यावर भर द्यावा. तसेच आहारात प्रोबायोटिक्स (उदा. दही) आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारेल आणि चिंता कमी होण्यास मदत होईल.