

कॅनबेरा : आजचा ऑस्ट्रेलिया जरी जगाच्या मुख्य भागांपासून दूर आणि वेगळा असला, तरी सुमारे 12 कोटी वर्षांपूर्वी तो अंटार्क्टिकासोबत जोडलेला एक विशाल भूमी खंड होता, जो ध्रुववृत्ताच्या जवळ स्थित होता. त्या काळात या भूमीवर डायनासोर राहायचे आणि एका नव्या अभ्यासातून आता आपल्याला या ‘ध्रुवीय डायनासोरां’च्या वास्तव्यातील निसर्गसृष्टी कशी होती याचा शोध लागला आहे.
या नव्या अभ्यासानुसार, त्या काळातील डायनासोर थंड-समशीतोष्ण जंगलांमध्ये फिरत असत, जिथे मोठमोठ्या फर्न्सची चटईसारखी दाट वनस्पती होती आणि नद्या त्यातून वाहत होत्या. येथे राहणार्या डायनासोरांमध्ये लहान ऑर्निथोपॉडस् (शाकाहारी, चोच व गालांत दात असलेले डायनासोर) आणि लहान थेरॉपॉडस् (बहुतेक मांसाहारी, दोन पायांवर चालणारे व अनेकदा पिसारा असलेले डायनासोर) यांचा समावेश होता, असे अभ्यासकांनी सांगितले आहे. ‘आज जेथे व्हिक्टोरिया राज्य आहे, ते कधीकाळी विषुववृत्तापासून सुमारे 80 अंश दक्षिणेला ध—ुववृत्तात होते, जिथे काही महिने सूर्यप्रकाश नसायचा,’ असे या अभ्यासाच्या सहलेखिका, मेलबर्न विद्यापीठातील पर्यावरणीय भूशास्त्राच्या प्राध्यापिका आणि स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरीमधील रिसर्च असोसिएट व्हेरा कोरासिडिस यांनी सांगितले. तरीही, अशा कठीण वातावरणातही डायनासोर भरभराटीत होते याचे पुरावे व्हिक्टोरिया राज्यातील अनेक जीवाश्मस्थळांवर सापडले आहेत.
क्रेटेशियस युगात (145 ते 66 दशलक्ष वर्षांपूर्वी), विशेषतः ‘अर्ली क्रेटेशियस’ कालखंडात (140 ते 110 दशलक्ष वर्षांपूर्वी), पृथ्वीवरील हवामान आजच्या तुलनेत 6 ते 14 अंश सल्सिअस अधिक उबदार होते, त्यामुळे त्या काळी ध—ुवीय बर्फटोप्यांचं अस्तित्वच नव्हतं, असे कोरासिडिस यांनी नमूद केले. पॅलिअँटॉलॉजिस्ट (जीवाश्मशास्त्रज्ञ) अनेक दशकांपासून दक्षिण ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे डायनासोरच्या जीवाश्मांचा अभ्यास करत आहेत. मात्र आता त्यांनी तिथल्या खडकांत सापडलेल्या अतिसूक्ष्म बीजधुलिका व परागकणांचाही सखोल अभ्यास सुरू केला आहे, जे त्या काळच्या वनस्पती जीवनाचा मागोवा घेण्यास मदत करतात. या नव्या अभ्यासात, कोरासिडिस आणि बार्बरा वॅगस्टाफ, मेलबर्न विद्यापीठातील परागकण व बीजधूली विशेषज्ञ, यांनी व्हिक्टोरिया किनार्यावरील 48 ठिकाणांहून सुमारे 300 सॅम्पल्सचे विश्लेषण केले. हे नमुने 130 ते 110 दशलक्ष वर्षांपूर्वीचे असून, त्या काळातील वनस्पतींचा, जंगलांचा आणि पुराच्या मैदानांचा विकास कसा झाला हे स्पष्ट करतात.