

लंडन : वाढत्या तापमानाचा ताण दक्षिण ग्रीनलँडमधील ध्रुवीय अस्वलांच्या जनुकीय रचनेत बदल घडवून आणत असल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. हवामान बदलामुळे अस्तित्वाचा धोका निर्माण झाला असताना, स्वतःला वाचवण्यासाठी या अस्वलांमध्ये वेगाने जनुकीय उत्परिवर्तन होत असल्याचे शास्त्रज्ञांनी शोधले आहे.
जागतिक हवामान बदलामुळे ध्रुवीयअस्वलांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. फेब्रुवारी महिन्यात निर्माण होणार्या समुद्रातील बर्फाचे प्रमाण विक्रमी पातळीपर्यंत खाली घसरले असून, वाढत्या उष्णतेमुळे समुद्राची पाणी पातळी वाढत आहे. ध्रुवीय अस्वल प्रामुख्याने बर्फाच्या थरांवर राहतात आणि तिथेच शिकार करतात. बर्फाचे हे थर आकुंचन पावत असल्याने त्यांच्या जगण्याचा संघर्ष तीव्र झाला आहे. दक्षिण ग्रीनलँडमधील अस्वलांचा एक समूह या आव्हानात्मक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये उत्क्रांती घडवून आणत असल्याचे दिसून आले आहे.
‘मोबाईल डीएनए’ या जर्नलमध्ये 12 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, हे अस्वल ‘जम्पिंग जीन्स’ चा वापर करून स्वतःचा डीएनए वेगाने ‘री-राईट’ (पुनर्लिखित) करत आहेत. मुख्य संशोधिका अॅलिस गॉडन यांच्या मते, ‘ग्रीनलँडच्या सर्वात उष्ण भागात राहणारा हा अस्वलांचा गट वितळणार्या बर्फाविरुद्ध जगण्यासाठी एक असाधारण धडपड करत आहे. ‘जम्पिंग जीन्स’च्या माध्यमातून ते त्यांच्या जनुकीय रचनेत बदल करत असल्याचे प्रथमच सिद्ध झाले आहे. याला वैज्ञानिक भाषेत ‘ट्रान्सपोसन्स’ म्हटले जाते. हे ‘ट्रान्सपोसन्स’ अस्वलांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यास मदत करत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. 2022 मधील एका अभ्यासात असे आढळले होते की, दक्षिण ग्रीनलँडमधील अस्वलांची ही टोळी उत्तर ग्रीनलँडमधील अस्वलांपासून 200 वर्षांपूर्वी वेगळी झाली होती. ही टोळी बर्फावर कमी अवलंबून आहे. आताच्या ताज्या संशोधनाने या अस्वलांच्या जनुकीय बदलांवर अधिक शिक्कामोर्तब केले आहे.
‘जम्पिंग जीन्स’ना विज्ञानाच्या भाषेत ‘ट्रान्सपोसन्स’ (Transposons) म्हणतात. हे डीएनएचे असे तुकडे असतात जे जीनोममधील एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी हलू शकतात. हे तुकडे जनुकीय कोडमध्ये ज्या ठिकाणी जाऊन बसतात, त्यानुसार इतर जनुके कशा प्रकारे कार्य करतील (Gene Expression) हे ठरते. ध्रुवीय अस्वलांच्या जीनोममध्ये एक तृतीयांशपेक्षा जास्त भाग या घटकांचा असतो. तुलनेने मानवी जीनोममध्ये याचे प्रमाण 45 टक्के तर वनस्पतींमध्ये 70 टक्क्यांपर्यंत असते.