World Record : बर्फाच्‍या पाण्यात १ तास ३८ सेकंद राहण्याचा पोलंडच्या मारियाचा विक्रम

सोशल मीडियावर व्हायरल
World Record
बर्फाच्‍या पाण्यात १ तास ३८ सेकंद राहण्याचा पोलंडच्या मारियाचा विक्रम
Published on: 
Updated on: 

वॉर्सा : जिथे काही मिनिटांतच माणसाचे रक्त गोठून जाईल, अशा हाडे गोठवणाऱ्या थंडीत पोलंडच्या मारिया ‘आइसब्रेकर’ बोडाज हिने १ तास ३८ सेकंद बर्फील्या पाण्यात घालवून एक नवा इतिहास रचला आहे. तिची ही प्रेरणादायी आणि अद्‌भुत कामगिरी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, तिने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस‌्म‌ध्ये आपले नाव सुवर्णअक्षरांनी नोंदवले आहे.

मारियाने थंडीवर विजय मिळवण्याचा अनोखा प्रवास २०२१ मध्‍ये सुरू केला. तेव्हापासून मारिया अतिथंड पाण्यात राहण्याचा सराव करत आहे. तिच्या मते, थंड पाणी आपल्याला संथगतीने चालणे, वर्तमानात जगणे आणि कठीण प्रसंगातही शांत राहणे शिकवते. ‘‘तुम्ही पाण्याची थंडी बदलू शकत नाही, पण त्यावर होणाऱ्या स्वतःच्या प्रतिक्रियेवर ताबा नक्कीच मिळवू शकता,’’ असे मारिया आत्मविश्वासाने सांगते.

एकापाठोपाठ एक अनेक रेकॉर्डस्‌

मारियाने अतिशय कमी कालावधीत बर्फाशी संबंधित अनेक थक्क करणारे रेकॉर्डस्‌ आपल्या नावावर केले आहेत. २८ जून २०२५ रोजी तिने संपूर्ण शरीरावर बर्फ ठेवून तब्बल ३ तास ३३ मिनिटे ३३ सेकंद राहण्याचा विक्रम केला. त्‍यानंतर १९ सप्टेंबर २०२५ रोजी बर्फाच्‍या अतिथंड पाण्यात १ तास ३८ सेकंद बुडून राहून महिला गटामध्ये नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. २१ फेब्रुवारी रोजी बर्फाच्या थेट संपर्कात १ तास ३३ मिनिटे ३३ सेकंद राहून (पूर्ण शरीर) आणखी एक यश मिळवले.

अतिथंड वातावरणात शांत राहण्याचे गुपित

एवढ्या कडक थंडीत स्वतःवर नियंत्रण ठेवणे सोपे नसते. मारिया यासाठी तिच्या श्वासोच्छवासावर पूर्ण लक्ष केंद्रित करते आणि पाण्यात येणाऱ्या हवेच्या बुडबुड्यांकडे पाहत मन शांत ठेवते. तिचे गुरू वैलेरियन रोमानोव्स्की सांगतात की, शांत राहूनच आपण थंडीला समजू शकतो. मारिया मनात भीती ठेवण्याऐवजी नेहमी सकारात्मक विचार आणि जिज्ञासा ठेवते.

महिलांसाठी दिला खास संदेश

मारिया स्पष्ट करते की, ती हे सर्व केवळ रेकॉर्ड बनवण्यासाठी करत नाही. तिला जगाला, विशेषतः महिलांना हे दाखवून द्यायचे आहे की, प्रत्येक माणसाच्या आत एक अदृश्य आणि प्रचंड ताकद दडलेली असते. मन आणि शरीराला समजून घेतल्यास आपण कोणत्याही अशक्य गोष्टीवर विजय मिळवू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news