

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील एका गुहेत संशोधकांना 60,000 वर्षांपूर्वीच्या बाणांची टोके सापडली असून, हे जगातील ‘विषारी शस्त्रास्त्रांचे’ सर्वात जुने पुरावे असल्याचे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. या शोधामुळे मानवाकडून शिकारीसाठी विषाचा वापर करण्याच्या इतिहासाचा काळ थेट 60,000 वर्षांनी मागे गेला आहे.
‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात बुधवारी (7 जानेवारी) प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, शास्त्रज्ञांनी दक्षिण आफ्रि केतील ‘उम्हलतुझाना’ नावाच्या खडकाळ निवार्यात दशकांपूर्वी सापडलेल्या 10 बाणांच्या टोकांचे रासायनिक विश्लेषण केले. यातील पाच टोकांवर मंद गतीने परिणाम करणार्या विषाचे अंश सापडले आहेत. हे विष कदाचित ‘टंबलवीड’ या वनस्पतीपासून बनवले असावे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
या विषाचा मुख्य उद्देश शिकारीला कमकुवत करणे हा होता, जेणेकरून मोठ्या प्राण्यांचा पाठलाग करण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम वाचतील. स्टॉकहोम विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक स्वेन इसाकसन यांच्या मते, ‘माणूस अन्नासाठी आणि अवजारे बनवण्यासाठी अनेक काळापासून वनस्पतींवर अवलंबून आहे; परंतु हा शोध वनस्पतींच्या ‘जैव-रासायनिक’ गुणांचा जाणीवपूर्वक केलेला वापर सिद्ध करतो.‘या शोधामुळे हे देखील स्पष्ट होते की, प्रागैतिहासिक काळातील शिकारी अत्यंत गुंतागुंतीचा विचार करू शकत होते.
बाणावरील विष त्वरित परिणाम करत नाही, तर त्याला वेळ लागतो. याचा अर्थ असा की, त्या काळातील मानवाला ‘कार्य-कारण भाव’ समजला होता आणि ते आपल्या शिकारीचे आगाऊ नियोजन करत असत. यापूर्वी, विषारी शस्त्रांचा सर्वात जुना पुरावा दक्षिण आफ्रिकेतीलच क्रुगर गुहेत सापडला होता, जो सुमारे 7,000 वर्षे जुना होता. 24,000 वर्षांपूर्वीचे काही अप्रत्यक्ष पुरावे मिळाले होते; परंतु त्याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद होते. विषाचे घटक काळानुसार नष्ट होतात;
परंतु काही विशिष्ट परिस्थितीत ते टिकून राहू शकतात. उम्हलतुझाना येथे 1985 मध्ये उत्खनन करण्यात आले होते. तेव्हा 65,000 ते 60,000 वर्षांपूर्वीच्या ‘हॉविएसन्स पूर्ट’ कालखंडातील दगडाचे 649 तुकडे सापडले होते. त्यावेळी फक्त ते बाणाला चिकटवण्यासाठी वापरलेल्या डिंकाचा शोध घेतला गेला होता. मात्र, इसाकसन आणि त्यांच्या पथकाने सूक्ष्म अवशेषांचे बारकाईने निरीक्षण केल्यावर या ऐतिहासिक विषाचा उलगडा झाला.