प्लूटोचे धूसर आवरणच करते हवामानावर नियंत्रण

जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीचा नवा खुलासा!
pluto-hazy-atmosphere-controls-its-weather
प्लूटोचे धूसर आवरणच करते हवामानावर नियंत्रणPudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : सूर्यमालेच्या दूरवरच्या टोकावर असलेला बटू ग्रह प्लूटो पुन्हा एकदा खगोलशास्त्रज्ञांना चकित करत आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या ताज्या निरीक्षणातून असे दिसून आले आहे की, प्लूटोच्या भोवती असलेले धूसर निळसर आवरण केवळ एक द़ृश्य चमत्कार नसून, ते या बटू ग्रहाच्या हवामानावर थेट नियंत्रण ठेवते.

सन 2015 मध्ये ‘नासा’च्या ‘न्यू होरायझन्स’ यानाने प्लूटोला भेट दिली, तेव्हा या बर्फाळ ग्रहाबद्दलची आपली समज पूर्णपणे बदलून गेली. प्लूटो हा केवळ बर्फाचा एक शांत गोळा नसून, त्यावर बर्फाची विस्तीर्ण मैदाने आणि उंचच उंच खडबडीत पर्वत असल्याचे दिसून आले; पण सर्वात मोठे आश्चर्य होते ते म्हणजे प्लूटोच्या पृष्ठभागापासून तब्बल 300 किलोमीटर (185 मैल) उंचीपर्यंत पसरलेले निळसर, बहुस्तरीय धूसर आवरण. शास्त्रज्ञांच्या अंदाजापेक्षा हे आवरण खूपच जास्त उंच आणि गुंतागुंतीचे होते. आता, जवळपास एका दशकानंतर, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या नवीन माहितीने या धुक्याच्या महत्त्वाला अधोरेखित केले आहे.

फ्रान्समधील पॅरिस वेधशाळेचे खगोलशास्त्रज्ञ आणि या विश्लेषणाचे नेतृत्व करणारे तांग्य बेरट्रँड यांनी सांगितले की, ‘हे सूर्यमालेत अद्वितीय आहे. आपण असे म्हणू शकतो की, हे एका नवीन प्रकारचे हवामान आहे.’ हे संशोधन 2 जून रोजी ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. प्लूटोच्या वातावरणातील हे उंच धूसर आवरण सूर्यप्रकाशामुळे मिथेन आणि नायट्रोजन वायूंच्या रासायनिक अभिक्रियेतून तयार झालेल्या जटिल सेंद्रिय रेणूंनी बनलेले आहे. हे कण दिवसा सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि रात्री अवरक्त ऊर्जेच्या (infrared energy) रूपात ती ऊर्जा अवकाशात परत फेकतात. यामुळे वायूंच्या तुलनेत वातावरण अधिक प्रभावीपणे थंड होते. याच कारणामुळे प्लूटोच्या वरच्या वातावरणाचे तापमान उणे 203 अंश सेल्सिअस (-333 अंश फॅरेनहाईट) इतके थंड आहे, जे अपेक्षित तापमानापेक्षा 30 अंशांनी कमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news