Plastic Eating Fungus | प्लास्टिक खाणाऱ्या बुरशीचा पाकिस्तानातील कचऱ्यात शोध!

Plastic Eating Fungus |
Plastic Eating Fungus | प्लास्टिक खाणाऱ्या बुरशीचा पाकिस्तानातील कचऱ्यात शोध!
Published on
Updated on

इस्लामाबाद : जगभरात दिवसेंदिवस वाढणारा प्लास्टिकचा कचरा हा शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवाद्यांसाठी अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. प्लास्टिक शेकडो वर्षे नष्ट न होणे हे यामागील सर्वात मोठे कारण आहे. मात्र, शास्त्रज्ञांनी प्लास्टिकला नष्ट करणाऱ्या एका बुरशीचा शोध लावला आहे. ही बुरशी चक्क प्लास्टिक खाते! पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील कचरा डेपोच्या मातीतून ही बुरशी वेगळी करण्यात आली आहे.

शास्त्रज्ञांना संशोधनादरम्यान आढळले आहे की, ‘एस्परजिलस ट्यूबिंगेन्सिस’ (Aspergillus tubingensis) नावाची ही बुरशी ‘पॉलिस्टर पॉलियुरेथेन’ (Polyester Polyurethane - PU) या प्लास्टिकला तोडू शकते. ‘पॉलियुरेथेन’ हे अतिशय मजबूत प्लास्टिक मानले जाते, ज्याचा वापर कृत्रिम चामड्याचे कोटिंग (Synthetic Leather), कुशन, इन्सुलेशन आणि विविध औद्योगिक उत्पादनांमध्ये केला जातो. या बुरशीबाबतची पहिली माहिती ‘एनव्हायरनमेंटल पोल्युशन’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासातून समोर आली होती.

संशोधकांनी प्रयोगशाळेत आणि मातीत पॉलियुरेथेन दाबून केलेल्या विविध प्रयोगांद्वारे या बुरशीची चाचणी घेतली. अभ्यासादरम्यान संशोधकांना असे दिसून आले की, ही बुरशी सर्वात आधी पॉलियुरेथेनच्या पृष्ठभागावर पसरते. ‘स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी’द्वारे पाहिले असता, प्लास्टिकच्या पृष्ठभागावर ओरखडे, तडे, क्षरण आणि छिद्रे पडल्याचे स्पष्टपणे दिसून आले. तसेच, स्पेक्ट्रोस्कोपी चाचणीत (ATR-FTIR) असे स्पष्ट झाले की, ही बुरशी केवळ प्लास्टिकला भौतिक नुकसान पोहोचवत नाही, तर त्यातील रासायनिक बंधदेखील तोडते. द्रव-संवर्धन (Liquid-Culture) प्रयोगादरम्यान तर दोन महिन्यांनंतर पॉलियुरेथेनचा थर बारीक तुकड्यांमध्ये पूर्णपणे विभाजित झाला होता.

पॉलियुरेथेनचा वापर आपल्या रोजच्या वापरातील आणि उद्योगांमधील अनेक वस्तूंमध्ये होतो आणि ते सहजासहजी नष्ट होत नाही. अशा परिस्थितीत इस्लामाबादमध्ये झालेला हा शोध ‘बायोडिग्रेडेशन’ (जैव-विघटन) संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या शोधामुळे संशोधकांमध्ये एक नवीन आशा निर्माण झाली आहे. यांत्रिक किंवा रासायनिक प्रक्रियेऐवजी या नैसर्गिक बुरशीचा वापर करून कठीण प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य होऊ शकते. निसर्गात आढळणाऱ्या एका सूक्ष्मजीवामध्ये प्लास्टिक नष्ट करण्याची क्षमता असणे हा एक मोठा चमत्कार मानला जात आहे. आता शास्त्रज्ञ या बुरशीतील एन्झाईम्सचा सखोल अभ्यास करत आहेत, जेणेकरून ही प्रक्रिया नेमकी कशी घडते हे अधिक स्पष्ट होऊ शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news