

बीजिंग : सुमारे 250 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवरील 80 टक्के जीवसृष्टी नष्ट करणारा ‘महाविनाश‘ वनस्पतींसाठी इतका विनाशकारी नव्हता, असे नवीन जीवाश्म संशोधनातून समोर आले आहे. वैज्ञानिकांनी चीनमध्ये असा एक परिसर शोधला आहे, जिथे त्या विनाशकारी घटनेतही वनस्पती टिकून राहिल्या.
हा मोठा विनाश 251.9 दशलक्ष वर्षांपूर्वी पर्मियन युगाच्या शेवटी आणि ट्रायसिक युगाच्या सुरुवातीला घडला. त्या काळात पृथ्वीवरील भूप्रदेश प्रामुख्याने एकत्रित होता आणि तो पँजिया या महाखंडाच्या रूपात अस्तित्वात होता. मात्र, हळूहळू तो विभाजित होण्याच्या प्रक्रियेत होता. सायबेरियन ट्रॅप्स नावाच्या ज्वालामुखी प्रणालीतून मोठ्या प्रमाणावर ज्वालामुखी उद्रेक झाले, ज्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण अत्यंत वाढले. एका 2021 च्या अभ्यासानुसार, त्या काळात वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण सुमारे 2500 पीपीएमपर्यंत पोहोचले होते, जे आजच्या 425 पीपीएमच्या तुलनेत बरेच जास्त आहे. या ज्वालामुखी उद्रेकांमुळे जागतिक तापमानवाढ आणि महासागर आम्लता वाढली, ज्यामुळे समुद्रातील परिसंस्थांचा मोठ्या प्रमाणावर नाश झाला.
मात्र, जमिनीवरील परिस्थिती स्पष्ट नव्हती, कारण त्या काळातील भूस्तरांमध्ये आढळणारे जीवाश्म अत्यंत मर्यादित आहेत. नवीन संशोधनानुसार, आजच्या ईशान्य चीनमध्ये असलेल्या एका भागात वनस्पतींना हा विनाश फारसा परिणामकारक ठरला नाही. तिथे बियांची निर्मिती करणारी जिम्नोस्पर्म वनं तसेच फर्न्स (स्पोअर निर्मिती करणार्या वनस्पती) वाढत राहिल्या. ‘किमान या भागात तरी आम्हाला वनस्पतींचा महाविनाश झाल्याचे पुरावे आढळत नाहीत,’ असे अभ्यास सहलेखक आणि मिसुरी युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथील भूगर्भशास्त्र आणि भूभौतिकीचे प्राध्यापक वान यांग यांनी सांगितले. ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात प्रकाशित या संशोधनानुसार, ‘महाविनाश‘ हा समुद्रात जितका व्यापक होता, तितका तो जमिनीवर नव्हता. काही भागांमध्ये परिसंस्था तुलनेने अबाधित राहिल्या, याचा अर्थ भूगर्भशास्त्र आणि पुराजीवशास्त्र यांच्यात या घटनेचा अधिक सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.