

प्रिटोरिया : दक्षिण आफ्रिकेतील एका प्रसिद्ध जलाशयाचे उपग्रहाने टिपलेले छायाचित्र सध्या चर्चेचा विषय बनले आहे. या छायाचित्रात जलाशयाचा पृष्ठभाग शेवाळ आणि जलपर्णींच्या दाट थराने पूर्णपणे हिरवा पडल्याचे दिसत आहे. पाहताना हे द़ृश्य विलोभनीय वाटत असले, तरी ते पाण्यातील जीवसृष्टीसाठी अत्यंत घातक ठरत असून, यामुळे मोठ्या प्रमाणात मासेमारीवर संकट आले आहे.
हे धरण प्रिटोरियापासून साधारण 40 किलोमीटर पश्चिमेला असलेल्या हर्टबीसपोर्ट येथे आहे. 1920 च्या दशकात बांधलेले हे कृत्रिम धरण ‘मगालीजबर्ग’ पर्वतरांगांच्या पायथ्याशी असून, याला ‘क्रोकोडाईल’ (आफ्रिकान्स भाषेत क्रोकोडिलरिव्हिएर) नदीतून पाणीपुरवठा होतो. शहरांना पिण्याचे पाणी पुरवण्यासोबतच हे ठिकाण नौकाविहार आणि मासेमारीसारख्या पर्यटन उपक्रमांसाठी ओळखले जाते. सहसा मोठ्या जलाशयांमध्ये हवामानातील बदलामुळे कधीतरी शेवाळाची वाढ होते. मात्र, नासाच्या ‘अर्थ ऑब्झर्व्हेटरी’नुसार, हर्टबीसपोर्ट धरणाची स्थिती ‘हायपर-युट्रोफिकेशन’ (अति-पोषण) या टप्प्यावर पोहोचली आहे.
याचा अर्थ पाण्यात नायट्रोजन आणि फॉस्फरस यांसारख्या पोषक घटकांचे प्रमाण हे प्रमाणाबाहेर वाढले आहे. यामुळे येथे शेवाळाची वाढ अत्यंत वेगवान आणि दाट असते. या वनस्पतींच्या वाढीमुळे पाण्याचे गंभीर नुकसान होत आहे. विषारी रसायने : हे शेवाळ पाण्यात विषारी द्रव्ये सोडते, ज्यामुळे पाणी दूषित होते. डेड झोन्स (मृत क्षेत्र) : पाण्यावर पसरलेल्या दाट थरामुळे सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजन तळापर्यंत पोहोचू शकत नाही. यामुळे पाण्यात ‘डेड झोन्स’ तयार होतात, जिथे ऑक्सिजनअभावी मासे आणि इतर जलचर मृत्युमुखी पडतात.