

नवी दिल्ली : भारतामधील सुमारे 35 टक्के लोक शाकाहारी आहेत, असे सांगितले जाते. आता एका संशोधनात वनस्पतीआधारित आहार फक्त नैतिक किंवा पर्यावरणपूरक नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. ताज्या भाज्या, फळे आणि धान्याचा आहारातील वापर हा कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका कमी करतो, असे निष्कर्ष एका संशोधनातून पुढे आले आहे.
व्ही. व्हियालॉन आणि सहकार्यांनी ‘सायटिंफिक रिपोर्टस्’ जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात ‘हेल्दी लाईफस्टाईल इंडेक्स’च्या (एचएलआय) आधारे विविध जीवनशैलींचा रोगांवर होणारा परिणाम आणि निष्कर्ष दिले आहेत. या अभ्यासात आढळले की, आरोग्यदायी वनस्पतीआधारित आहार घेणार्या व्यक्तींमध्ये टाईप-2 मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकारांमुळे अकाली मृत्यूचा धोका कमी आहे.
धूम्रपान, मद्यसेवन, जास्त झोप किंवा जास्त चरबी यांसारख्या सवयींनी धोका वाढतो. या संशोधनातील पुढील टप्प्यात स्पेन, डेन्मार्क, दक्षिण कोरिया आणि यूके येथील शास्त्रज्ञांनी एकत्रित अभ्यास केला. त्यांनी ‘प्लांट बेस डाएटरी पॅटर्न अँड एज स्पेसिफिक रिस्क ऑफ मल्टिमॉर्बिडिटी ऑफ कॅन्सर अँड कार्डिओमेटॅबॉलिक डिसिज’ या शीर्षकाखाली वनस्पतीआधारित आहारामुळे एकाच व्यक्तीत अनेक दीर्घकालीन आजार होण्याचा धोका कसा कमी होतो, हे सिद्ध केले.
यातील ‘मल्टिमॉर्बिडिटी’ म्हणजे एका व्यक्तीत दोन किंवा अधिक दीर्घकालीन आजार (जसे की कर्करोग आणि हृदयविकार) असणे होय. या अभ्यासानुसार, वनस्पतीजन्य आहार घेणार्यांमध्ये अशा आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आढळले. हे संशोधन स्पष्ट सांगते की, ‘फळे, भाज्या, डाळी, धान्य आणि सुका मेवा यांचा समतोल आहार घेतल्यास केवळ शरीर तंदुरुस्त राहत नाही, तर आयुष्याची गुणवत्ता आणि दीर्घायुष्य दोन्ही वाढते.’