

शांघाय : लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. याचा अर्थ कुणाला कोणता जोडीदार मिळणार हे सर्वस्वी त्या दैवी शक्तीच्या हातात असते. मात्र, त्यासाठीची शोधाशोध ही माणसालाच करावी लागते! आधुनिक काळात आपल्याकडे यासाठी वधू-वर सूचक मंडळांचे पेव फुटले आहे. सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे. या काळात डेटिंग किंवा मॅट्रिमोनी अॅपचेही पेव फुटले आहे. या इंटरनेटच्या युगात देखील अजूनही असा एक देश आहे, जिथे वधू-वरांचा बाजार भरतो, असे तुम्हाला कोणी सांगितले? तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही, मात्र हे खरे आहे.
चीनमधील शांघाय शहरात आजही वधू-वरांचा बाजार भरतो, शांघायमधील वधू-वरांचा बाजार चीनमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या बाजारामध्ये शक्यतो ज्यांना लग्न करायचे आहे, ते वधू वर येत नाहीत, तर त्यांचे आई-वडील, आजी-आजोबा किंवा इतर नातेवाईक येतात. ते आपल्या मुलीसाठी किंवा मुलासाठी सुटेबल अशा वधू किंवा वराची निवड करतात. ते यावेळी येताना आपल्यासोबत बायोडाटा देखील घेऊन येतात.
या बायोटेडामध्ये संबंधित वधू किंवा वराची संपूर्ण माहिती असते जसे की त्याचे वय, नोकरी, त्याच्या नावावर किती संपत्ती आहे, या सर्व गोष्टी असतात. या बाजारात वधू किंवा वराचे आई-वडील हे बाजारात एका मोठ्या छत्री खाली बसलेले असतात, ज्याप्रमाणे बाजारात गेल्यानंतर आपल्याला संबंधित भाज्याचे दरफलक लावलेले दिसतात त्याचप्रमाणे वधू किंवा वराचे आई वडील आपल्या मुलाचा किंवा मुलीचा बायोडाटा हा छत्रीवर लावतात. किंवा जमिनीवर ठेवतात. जर एखाद्या व्यक्तीला हा बायोडेटा आवडला तर त्यानंतर लग्नाची पुढील बोलणी केली जातात.