

सिंगापूर : निसर्गातील वनस्पती ज्या प्रक्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात, त्याच ‘प्रकाशसंश्लेषण’ प्रक्रियेचा वापर आता डोळ्यांच्या आजारावर उपचारासाठी केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शास्त्रज्ञांनी पालकच्या पानातून घेतलेल्या घटकांचा वापर करून असे थेंब तयार केले आहेत, ज्यामुळे उंदरांच्या डोळ्यांमध्ये प्रकाशसंश्लेषणाचे काही टप्पे यशस्वीरीत्या पार पडले.
१५ मे रोजी ‘सेल’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, हे आय ड्रॉप्स प्रकाशावर आधारित प्रक्रियेचा वापर करून ‘ड्राय आय’ या आजाराची लक्षणे कमी करतात. संशोधकांनी सध्या ही चाचणी उंदरांवर केली असली, तरी भविष्यातील चाचण्या यशस्वी झाल्यास मानवावरही याचे उपचार केले जाऊ शकतील, अशी आशा आहे. निसर्गातील सहजीवनाचा हा एक उत्तम आणि नावीन्यपूर्ण वापर असल्याचे हार्वर्ड मेडिकल स्कूलचे पेशीजीवशास्त्रज्ञ कोरी अलार्ड यांनी म्हटले आहे. वनस्पती सूर्यप्रकाशापासून ऊर्जा (ग्लुकोज) तयार करण्यासाठी प्रकाशसंश्लेषणावर अवलंबून असतात.
वनस्पतींमधील ‘हरितलवक’ (Chloroplasts) हा घटक ही प्रक्रिया करतो आणि त्यामुळेच वनस्पतींना हिरवा रंग मिळतो. प्राण्यांमध्ये नैसर्गिकरीत्या ही प्रक्रिया होत नसली, तरी ‘लीफ शीप’सारख्या काही समुद्री गोगलगायी शैवालांमधील हरितलवक चोरून या ऊर्जेचा वापर करतात. सिंगापूर नॅशनल युनिव्हर्सिटीचे केमिकल इंजिनिअर डेव्हिड ताई लिओंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विचार केला की, सस्तन प्राण्यांचे डोळेदेखील अशा प्रकारची प्रक्रिया स्वीकारू शकतात का? ‘ड्राय आय’ या आजारात डोळ्यांवरील पाण्याचा थर सुकतो, ज्यामुळे जळजळ आणि अंधुक दृष्टीची समस्या निर्माण होते.
यावर इलाज शोधण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. हे आय ड्रॉप्स तयार करण्यासाठी संशोधकांनी प्रथम पालकच्या पानांमधील हरितलवकातून ‘थायलाकॉईड ग्रॅना’ (Thylakoid grana) नावाचे कप्पे वेगळे केले. या थायलाकॉईड ग्रॅनामध्येच हरितद्रव्य (Chlorophyll) असते, जिथे प्रकाशसंश्लेषणाचा पहिला टप्पा पार पडतो. संशोधकांनी या थायलाकॉईडस्च्या रचनेला एका छोट्या पॅकेजमध्ये बंद केले आणि या प्रणालीला ‘लीफ’ (LEAF-Light-reaction enriched thylakoid NADPH-foundry) असे नाव दिले.
जेव्हा हे ‘लीफ’ (LEAF) तंत्रज्ञान असलेले आय ड्रॉप्स ड्राय आयचा त्रास असलेल्या उंदरांच्या डोळ्यांत टाकण्यात आले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांची जळजळ आणि सूज लक्षणीयरीत्या कमी झाली. वनस्पतींमध्ये ग्लुकोज तयार होत असताना, हरितलवक हे थायलाकॉईड ग्रॅनामध्ये ‘NADPH’ नावाचे रसायन तयार करतात. हे ‘NADPH’ एक अँटीऑक्सिडंट (Antioxidant) म्हणून काम करते. उंदरांच्या डोळ्यांत टाकल्यानंतर या रसायनाने डोळ्यांची जळजळ वाढवणाऱ्या घटकांना नष्ट केले आणि उंदरांना आराम मिळाला.