

लिमा : जगातील सर्वात प्रसिद्ध भू-रेखाटने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेरूतील ‘नाझ्का लाईन्स’ नेमक्या कशासाठी कोरल्या गेल्या होत्या, यावर गेल्या अनेक दशकांपासून जगभरातील संशोधकांमध्ये खल सुरू आहे. सुमारे २ हजार वर्षे जुनी आणि एकत्रितपणे १,३०० किलोमीटरपेक्षा (८०० मैल) अधिक लांबीची ही रेखाटने मानव, प्राणी, भौमितिक आकार, वनस्पती आणि फुलांचे विविध नमुने दर्शवतात.
पेरूच्या किनारपट्टीवरील शुष्क टेकड्या आणि दऱ्यांमध्ये इसवी सन पूर्व २०० ते इसवी सन ५०० या काळात नाझ्का संस्कृतीच्या लोकांनी ही अद्वितीय रेखाटने साकारली होती. त्या काळात या प्रदेशात लेखनाची कला अस्तित्वातही नव्हती. या रेखाटनांची एकूण संख्या किती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; परंतु त्यांची संख्या हजारो असून, आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने अजूनही अनेक नवीन भू-रेखाटने सातत्याने उजेडात येत आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा या रेखाटनांचा औपचारिक अभ्यास सुरू झाला, तेव्हापासून ‘ही रेखाटने का कोरली गेली?’ हा प्रश्न संशोधकांना भेडसावत आहे. यावर अद्याप कोणतेही एक निश्चित उत्तर मिळालेले नसले, तरी तज्ज्ञांनी यामागे विविध शक्यता मांडल्या आहेत.
अमेरिकेतील नॉर्थईस्टर्न इलिनॉय युनिव्हर्सिटीतील कला इतिहासाच्या प्राध्यापिका ॲॅना निवेस यांनी याविषयी माहिती देताना सांगितले, 'या रेखाटनांचा उद्देश आणि अर्थ याबद्दल अनेक मते आहेत. या परिसरातील भू-रेखाटनांचे बारकाईने निरीक्षण केल्यास लक्षात येते की, त्यांच्या शैली वेगवेगळ्या आहेत. काही आकाराने खूप मोठी, तर काही लहान आहेत. काही टेकड्यांच्या उतारावर कोरलेली आहेत, तर काही विस्तीर्ण मैदानांवर पसरलेली आहेत. त्यामुळे या सर्वांसाठी एकच कारण लागू पडणे शक्य वाटत नाही.' गेल्या काही वर्षांत या रेखाटनांविषयी अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत. यातील काही सिद्धांतांनुसार परग्रहावरील जीवांची अंतराळयाने उतरवण्यासाठी ही जागा तयार करण्यात आली होती, असा विचित्र दावाही केला गेला होता. तथापि, अधिक वास्तववादी अभ्यास या रेखाटनांना सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथांशी जोडतो.
जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ ऑग्जसबर्गचे कला इतिहासाचे प्राध्यापक कार्स्टन लँबर्स यांनी आपल्या एका शोधनिबंधात नमूद केले आहे, 'या भू-रेखाटनांचा उद्देश सांगणे अत्यंत कठीण आहे, कारण आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे लिखित किंवा मौखिक पुरावे उपलब्ध नाहीत. कालांतराने या रेखाटनांचा वापर आणि उद्देश बदलत गेला असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.' एका सिद्धांतानुसार, सुरुवातीला प्रवासी आणि व्यापारी तांड्यांसाठी मार्गदर्शक खुणा (रूट मार्कर) म्हणून ही रेखाटने कोरण्यात आली असावीत, तर नंतरच्या काळात ही ठिकाणे सामाजिक एकत्रिकरण आणि सामूहिक मेजवान्यांची केंद्रे बनली असावीत. २०२६ मधील एका अभ्यासात संशोधकांनी नमूद केले आहे की, नाझ्का संस्कृतीतील सुरुवातीची काही भू-रेखाटने टेकड्यांच्या उतारावर आणि मुख्य पायवाटांच्या जवळ कोरण्यात आली होती. ती खूप लांबूनही स्पष्ट दिसायची. याचा अर्थ असा असू शकतो की, प्रवास करताना मार्ग समजण्यासाठी आणि तात्पुरत्या मुक्कामासाठी योग्य जागा दर्शवण्यासाठी या खुणांचा वापर केला गेला असावा.
याशिवाय, ही भू-रेखाटने खगोलीय घटनांशी जोडलेली असून एक प्रकारचे ‘कॅलेंडर’ म्हणून वापरली जात असावीत, असाही एक मतप्रवाह आहे. डिसेंबर १९४१ मध्ये इतिहासकार पॉल कोसोक यांनी या रेषांचा अभ्यास करून त्यांचा खगोलीय घटनांशी संबंध असल्याचे सांगितले होते. त्यानंतर गणितज्ज्ञ मारिया राइश यांनी कोसोक यांच्या अभ्यासाला पुढे नेत सलग ४० वर्षांहून अधिक काळ नाझ्का लाईन्सचा अभ्यास केला. त्यांच्या मते, अनेक भू-रेखाटनांचा विविध खगोलीय घटकांशी थेट संबंध होता. मात्र, २०२१ मध्ये आधुनिक संशोधकांनी केलेल्या विश्लेषणानुसार, अतिशय मोजक्याच रेखाटनांचा एखाद्या ताऱ्याशी किंवा अयनांतासारख्या (Solstice) सूर्य-घटनेशी संबंध जुळत असल्याचे समोर आले आहे.