

वॉशिंग्टन : ‘नासा’चे पर्सिव्हरन्स रोव्हर सध्या मंगळावरील एका अत्यंत जुन्या आणि रहस्यमय खडकांनी भरलेल्या नव्या भागात पोहोचले आहे. या भागातील खडक हे मंगळाच्या अगदी सुरुवातीच्या भूगर्भीय काळातील असू शकतात, अशी शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये 28- मैल रुंद (45 किमी) असलेल्या जिझेरो क्रेटरमध्ये उतरलेला पर्सिव्हरन्स रोव्हर मागील चार वर्षांपासून विविध भूभागांचा अभ्यास करत आहे. त्याचा मुख्य उद्देश म्हणजे मंगळावरील प्राचीन जीवसृष्टीच्या खुणा शोधणे आणि भविष्यकाळात पृथ्वीवर आणण्यासाठी खनिजांचे नमुने संकलित करणे. आता हे यांत्रिक बग्गीसद़ृश रोव्हर एका नव्या पठारावर पोहोचले आहे, ज्याला ‘क्रोकोडिलेन’ (नॉर्वेजियन भाषेत ‘मगर’) असे नाव दिले गेले आहे. नॉर्वेमधील प्रिन्स कार्ल्स फोरलँड बेटावरील डोंगररांगेच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले आहे.
हे पठार जवळपास 30 हेक्टर (73 एकर) क्षेत्रफळ व्यापलेले आहे आणि जिझेरो क्रेटरच्या प्राचीन किनारी खडकांमधील आणि त्यापलीकडील मंगळाच्या मैदानांमधील एक सीमारेषा मानली जाते. पूर्वीच्या अभ्यासांनुसार, क्रोकोडिलेनमध्ये क्ले मिनरल्स म्हणजेच चिकणमातीसारखी खनिजे असल्याचे संकेत आहेत. ही खनिजे केवळ द्रव पाण्याच्या उपस्थितीत तयार होतात. त्यामुळे जर पर्सिव्हरन्सला येथे अधिक अशा खनिजांचे पुरावे सापडले, तर या भागात कधीकाळी जीवन जगण्यासाठी अनुकूल परिस्थिती होती, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढता येऊ शकतो.
कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे वैज्ञानिक आणि परसिव्हरन्सचे उप-प्रकल्प वैज्ञानिक केन फार्ले यांनी सांगितले, ‘क्रोकोडिलेनमधील खडक जिझेरो क्रेटरच्या निर्मितीपूर्वी म्हणजे मंगळाच्या सर्वात सुरुवातीच्या ‘नोआशियन’ काळात तयार झाले. हे खडक मंगळावरील सर्वांत जुने खडकांपैकी एक आहेत. केन फार्ले पुढे म्हणाले, ‘जर आम्हाला येथे जैवसंकेत (biosignature) सापडले, तर ते मागील वर्षी ‘चेयावा फॉल्स’मध्ये सापडलेल्या संभाव्य जैवसंकेतांपेक्षा खूपच जुने असतील आणि मंगळाच्या उत्क्रांतीतील वेगळ्या टप्प्याशी संबंधित असतील. ‘चेयावा फॉल्स’ हा एक बाणाच्या टोकासारखा खडक आहे, ज्याचा अभ्यास 2024 मध्ये करण्यात आला होता. तेव्हा पर्सिव्हरन्सने अशा रासायनिक आणि रचनात्मक चिन्हांचा शोध लावला होता, जे प्राचीन सूक्ष्मजीवांच्या उपस्थितीशी सुसंगत होते, पण तीच चिन्हे काही भौगोलिक प्रक्रियांमुळेही निर्माण होऊ शकतात. म्हणूनच, हे जैवसंकेत ‘संभाव्य’च आहेत, निश्चित नाहीत.
जीवशास्त्रावर अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी पर्सिव्हरन्सच्या वैज्ञानिक साधनांची मर्यादा आहे. म्हणूनच, तो सध्या विविध नमुने गोळा करत आहे, जे भविष्यात पृथ्वीवर आणले जाऊ शकतात आणि तेथे आधुनिक प्रयोगशाळांमध्ये तपासले जाऊ शकतात. मात्र, हे भविष्य सध्या अनिश्चिततेच्या छायेत आहे. ट्रम्प प्रशासनाच्या 2026 च्या अर्थसंकल्प प्रस्तावानुसार, पर्सिव्हरन्सने गोळा केलेले नमुने पृथ्वीवर परत आणण्याचा सध्याचा योजनेचा रद्द करण्याचा प्रस्ताव आहे.