आहे मनोहर तरी (हिवाळ्यात) गमते उदास

या ऋतूत लोकांना एकटेपणा आणि उदास वाटू लागते
People feel lonely and depressed during winter season
हिवाळा ऋतूत लोकांना एकटेपणा आणि उदास वाटू लागतो. Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

सध्या हिवाळा ऋतू सुरू झाला असून सगळीकडे थंड वातावरण आणि गारवा जाणवू लागला आहे. हिवाळा ऋतू आपल्या शरीरात अनेक बदल घडवून आणतो. तसेच या ऋतूत दिवस लहान होऊन रात्र मोठी होऊ लागते. त्यातच तापमानात घट झाल्यामुळे अनेक शारीरिक बदलही होतात. त्यातील एक बदल म्हणजे या ऋतूत लोकांना एकटेपणा आणि उदास वाटू लागतो. विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये जिथे सतत हिमवृष्टी होत असते व वातावरण कुंद बनते तिथे ही समस्या अधिक आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की असे का होते? चला तर मग जाणून घेऊयात याचे कारण.

सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर

सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर हा नैराश्याचा एक प्रकार आहे. हा प्रकार सहसा हिवाळ्यात होण्याची शक्यता जास्त असते. कारण हिवाळ्यात दिवस कमी असल्याने वातावरणात बदल घडून येतात त्यामुळे लोकांना उदास वाटू लागते.

हिवाळ्यात उदास वाटण्याची कारणे

कमी सूर्यप्रकाश : हिवाळ्यात दिवस छोटा असतो त्यामुळे सूर्यप्रकाश देखील कमी असतो. सेरोटोनिनची पातळी नियंत्रित ठेवण्यास सूर्यप्रकाश महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. जेव्हा शरीराला योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो तेव्हा मनाच्या स्थितीवर परिणाम करणारे संप्रेरक सेरोटोनिनची पातळी वाढवतात; मात्र हिवाळ्याच्या दिवसात कमी सूर्यप्रकाशामुळे सेरोटोनिनची पातळी देखील कमी होते, ज्यामुळे तुम्हाला एकटेपणा वाटू लागतो.

मेलाटोनिन वाढणे : जेव्हा सूर्यप्रकाश कमी होतो तेव्हा आपल्या शरीरात मेलाटोनिन नावाच्या संप्रेरकाची पातळी वाढते. त्यामुळे आपल्याला सतत झोप येत असते. त्यातच हिवाळ्यात सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे मेलाटोनिनचे उत्पादन जास्त होते व आपल्याला अधिक थकवा जाणवतो आणि झोपही जास्त येते.

शारीरिक हालचाली कमी होणे : हिवाळ्यात थंडीमुळे अनेक लोकं घरातच राहणे पसंत करतात, ज्यामुळे नियमित होणारी आपल्या शरीराची हालचालही थंडीच्या दिवसात कमी होते. यामुळे आपल्याला अधिक प्रमाणात आळसपणा येऊ लागतो. इतर दिवसांमध्ये शारीरिक हालचालींमुळे आपला मूड सुधारण्यास मदत होते.

सामाजिक बांधिलकीत कमी : सामाजिक बांधिलकी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनुभवत असतो. आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटून आपले सामाजिक संबंध जोपासत असतो. त्याच तुम्ही देखील थंडीच्या दिवस घराबाहेर न पडल्याने कोणत्याच नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना भेटत होत नाही. अशाने आपले बोलणे चालणे कमी प्रमाणात होते. म्हणून अनेकांना एकटेपणा वाटू लागतो. आपल्या मानसिक आरोग्यासाठी सामाजिक संबंध खूप महत्त्वाचे आहेत.

उदास वाटण्याची काही सामान्य लक्षणे

एकाकी, निराश वाटणे, कमी ऊर्जा पातळी मिळणे, जास्त किंवा कमी झोप येणे, आहारात बदल होणे, वजन वाढणे, चिडचिडेपणा, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, सामाजिक संबंधांमध्ये रस कमी होणे.

उपाय :

लाईट थेरपीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा प्रकाश वापरला जातो, जो सूर्यप्रकाशासारखाच असतो. हे सेरोटोनिनचे उत्पादन वाढविण्यास मदत करते.

नियमित व्यायाम केल्याने आपला मूड सुधारू शकतो आणि ऊर्जेची पातळी वाढू शकते.

हेल्दी फूड खाल्ल्याने तुमचे शरीर निरोगी राहील आणि तुमचा मूडही चांगला होईल.

सामाजिक कार्यात सहभागी होऊन मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा.

सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळते. व्हिटॅमिन-डीची कमतरता हिवाळ्यात उद्भवू शकते, म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्हिटॅमिन-डी पूरक आहार घेऊ शकता.

योगा आणि मेडिटेशनमुळे तणाव कमी होतो आणि मन शांत होते.

जर तुम्ही खूप उदास असाल तर थेरपिस्टचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news