

पेनसिल्वेनिया, अमेरिका : एका नवीन आणि सर्वात जास्त वजन असलेल्या वांग्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नोंद केली आहे. या वांग्याचे वजन 3.969 किलो (8 पौंड 12 औंस) असून, हे वजन एका सामान्य पाळीव मांजरीच्या वजनाएवढे आहे.
हे अवाढव्य वांगे पेनसिल्वेनियातील हॅरिसन सिटी येथे राहणार्या शेतकरी एरिक गनस्ट्रॉम यांनी वाढवले. या वांग्याचा घेर 78.7 सें.मी. (2 फूट 7 इंच) आहे. एरिक गेल्या तीन वर्षांपासून विशेषतः वांगी वाढवत आहेत; पण त्यांना मोठ्या भाज्या वाढवण्याचा छंद त्याहूनही जुना असल्याचे त्यांनी सांगितले. एरिक म्हणाले, जगातील प्रत्येक व्यक्तीने जेवढी वांगी वाढवली आहेत, त्यापैकी मी पृथ्वीवरील सर्वात मोठे वांगे वाढवले आहे. एकाच वेळी दोन जागतिक विक्रमी वांग्यांची लागवड करून त्यांचे वजन करणे... ही भावना प्रत्येक माणसाने आयुष्यात एकदा तरी अनुभवली पाहिजे. पेनसिल्वेनिया जायंट पम्पकिन ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष जे योहे म्हणाले, एरिकने वाढवलेल्या या प्रचंड मोठ्या वांग्याचा आकार पाहून मला धक्काच बसला. माझ्या मूळ राज्यात हा जागतिक विक्रम झाल्याचा मला आनंद आहे. एरिकचे अभिनंदन!