Humanoid Robot Pemba | ‘पेंबा’ रोबोची आता माऊंट एव्हरेस्टवर चढाईची तयारी

Humanoid Robot Pemba |
Humanoid Robot Pemba | ‘पेंबा’ रोबोची आता माऊंट एव्हरेस्टवर चढाईची तयारी
Published on
Updated on

काठमांडू : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एका नव्या इतिहासाची नोंद झाली आहे. 'पेंबा' नावाच्या एका अत्याधुनिक ह्युमनॉईड (मानवासारख्या दिसणाऱ्या) रोबोने इक्वाडोरमधील बर्फाच्छादित आणि अत्यंत धोकादायक 'चिंबोराजो' ज्वालामुखीवर ६ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीपर्यंत यशस्वी चढाई केली आहे. एवढ्या उंचीवर पोहोचणारा हा जगातील पहिलाच ह्युमनॉईड रोबो ठरला आहे. हा पराक्रम गाजवल्यानंतर आता हा रोबो जगातील सर्वोच्च शिखर 'माऊंट एव्हरेस्ट' सर करण्यासाठी सज्ज होत आहे.

१.३२ मीटर उंच आणि ३५ किलो वजनाच्या या रोबोने हा प्रवास अत्यंत गोठवणाऱ्या थंडीत आणि ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमध्ये पूर्ण केला. अर्थात अत्यंत दुर्गम आणि तांत्रिकदृष्ट्या कठीण चढणीच्या ठिकाणी टीमच्या सदस्यांना त्याला काही प्रमाणात आधारही द्यावा लागला होता. हा रोबो तयार करणाऱ्या वैज्ञानिकांच्या मते, ही तर फक्त सुरुवात आहे. माऊंट एव्हरेस्टनंतर चंद्र आणि अखेर मंगळ ग्रहावर पाऊल ठेवणे हे त्यांचे पुढील मोठे ध्येय आहे. नेपाळमध्ये प्रस्तावित असलेल्या एव्हरेस्ट मोहिमेचा उद्देश केवळ विक्रम रचणे हा नाही, तर पेंबावर एव्हरेस्टच्या मोहिमेदरम्यान काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार आहेत.

यामध्ये पर्वतावर पर्यटकांनी टाकलेला कचरा गोळा करणे, पर्यावरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण डेटा (माहिती) गोळा करणे, धोकादायक भागांवर लक्ष ठेवणे (निगराणी करणे) आणि अत्यंत उंचावरील हवामानात रोबोच्या कार्यक्षमतेची चाचणी घेणे यांचा समावेश आहे. ही मोहीम एका अमेरिकन विनानफा संस्था (Non profit Organization) आणि नेपाळी एक्स्पेडिशन कंपनीने संयुक्तपणे प्रस्तावित केली आहे. प्रस्तावानुसार, पेंबाला वेगवेगळ्या भागांमध्ये (पार्टस्‌) विभागून पर्वतावर नेले जाईल. त्यानंतर बेस कॅम्प (५,३६४ मीटर) ते कॅम्प ४ (७,९२० मीटर) दरम्यानच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याची पुन्हा जुळवणी (असेम्बल) केली जाईल.

त्यानंतर तो आपल्या मेकॅनिकल हातांच्या सहाय्याने जुने गिर्यारोहण साहित्य आणि खाद्यपदार्थांची पाकिटे यांसारखा कचरा गोळा करेल. माऊंट एव्हरेस्टवर तापमान अनेकदा उणे २० अंश सेल्सिअसपेक्षा खाली जाते. एवढ्या कडक थंडीत रोबोची बॅटरी निकामी होण्याचा धोका असतो. म्हणूनच अभियंते यामध्ये 'हीटेड बॅटरी कंपार्टमेंट' आणि अंतराळ मोहिमांमध्ये वापरले जाणारे विशेष वंगण (लुब्रिकेंट) वापरत आहेत. तसेच एव्हरेस्टवरील खडबडीत आणि निसरड्या वाटेवर स्वतःचा तोल सांभाळण्यासाठी पेंबामध्ये ‘मशिन लर्निंग'वर आधारित प्रणाली विकसित केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news