

वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने सूर्याचे व सौरवादळाचे आतापर्यंतचे सर्वात जवळचे आणि स्पष्ट फोटो प्रसिद्ध केले आहेत. नासाच्या ‘पार्कर सोलर प्रोब’ या अंतराळयानाने सूर्याच्या पृष्ठभागापासून केवळ 3.8 दशलक्ष मैल (6.1 दशलक्ष किलोमीटर) अंतरावरून हे अभूतपूर्व फोटो टिपले आहेत. या नवीन फोटोंमुळे ‘सौरवार्या’मधील अनेक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये समोर आली आहेत, ज्यामुळे शास्त्रज्ञांना या रहस्यमय अंतराळ हवामानाच्या उत्पत्तीबद्दल आणि पृथ्वीवरील जीवनावर होणार्या त्याच्या परिणामांबद्दल अधिक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
सौरवारा म्हणजे सूर्याच्या बाहेरील वातावरणातून, ज्याला ‘कोरोना’ म्हणतात, सतत बाहेर पडणारा प्रभारित कणांचा प्रवाह होय. हा कणांचा महापूर संपूर्ण सूर्यमालेत तासी दहा लाख मैलांपेक्षा जास्त वेगाने पसरतो. हा वारा सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रासोबत मिळून पृथ्वीवर ध—ुवीय प्रकाश (ऑरोरा) निर्माण करतो, काही ग्रहांचे वातावरण नष्ट करू शकतो आणि पृथ्वीवरील पॉवर नेटवर्कमध्ये अडथळा आणू शकणार्या विद्युत प्रवाहांची निर्मिती करू शकतो. या अंतराळ हवामानाला समजून घेणे आणि त्याचा अंदाज लावणे हे अंतराळवीर आणि अंतराळयानांच्या संरक्षणासाठी, तसेच तीव्र सौरवादळांमुळे पायाभूत सुविधांवर होणारे परिणाम कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
2018 मध्ये प्रक्षेपित केलेले ‘पार्कर सोलर प्रोब’ हे सूर्याच्या कोरोनामध्ये प्रवेश करणारे पहिले अंतराळयान आहे. या मानवरहित यानावर WISPR ( Wide Field Imager for Solar Probe) Am[U SWEAP ( Solar Wind Electrons Alphas and Protons) यांसारखी अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. हे यान सूर्याची प्रचंड उष्णता आणि तीव्र किरणोत्सर्ग सहन करत शास्त्रज्ञांना सूर्याबद्दल आणि त्याच्या जवळच्या वातावरणाबद्दल तपशीलवार माहिती पुरवत आहे.
गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी सूर्याजवळून विक्रमी उड्डाण करताना, पार्कर प्रोबने कोरोनातून बाहेर पडल्यानंतर सौर वारा कसा हालचाल करतो याचे फोटो टिपले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यानाने कोरोनल मास इजेक्शन म्हणजेच प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्राच्या अनपेक्षित बुडबुड्यांमधील टक्करदेखील रेकॉर्ड केली. याबद्दल बोलताना जॉन्स हॉपकिन्स अप्लाईड फिजिक्स लॅबोरेटरीचे WISPR उपकरणाचे शास्त्रज्ञ अँजेलोस व्होर्लिडास यांनी सांगितले, ‘या फोटोंमध्ये आम्हाला कोरोनल मास इजेक्शन अक्षरशः एकमेकांवर रचलेले दिसत आहेत. ते एकमेकांमध्ये कसे विलीन होतात, हे समजून घेण्यासाठी आम्ही याचा वापर करत आहोत, जे अंतराळ हवामानासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकते.’