

पॅरिस ः जगभरात आपल्या आजूबाजूला अनेक घडामोडी घडत असतात. काही घटना अतिशय विचित्र आणि विचलित करणाऱ्या असतात. सध्या सोशल मीडियावर पॅरिसमधील एका व्यक्तीची जोरदार चर्चा सुरू आहे. या व्यक्तीची गोष्टी जगावेगळीच आहे. त्याने एका हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. तरुणपणी ‘चेक इन’ केल्यानंतर त्या हॉटेलची रूम इतकी आवडली की, त्याने या हॉटेलमधून तब्बल 67 वर्षांनी ‘चेक आऊट’ केलं. असं म्हटलं जातंय की, आतापर्यंत इतिहासातील हा सर्वात मोठा हॉटेल मुक्काम आहे.
या माणसाचे नाव आहे जीन ले बॉन. तो एक ‘ट्रॅव्हलिंग सेल्समन’ आहे. याच कामानिमित्त त्याने पॅरिसच्या प्रसिद्ध ग््राँड हॉटेलमध्ये ज्याचं आता नाव आहे ‘इंटरकॉन्टिनेंटल पॅरिस ले ग््राँड’ असे आहे, या हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. सुरुवातीला त्याने काही दिवसांसाठी रूम बुक केली होती; पण हळूहळू त्याला या ठिकाणी घरासारखं वाटायला लागलं. काही दिवस, महिने आणि अनेक वर्षे तो इथेच राहिला. जीन तब्बल 67 वर्षे या ठिकाणी राहिला. या हॉटेलमध्ये रोजची रूम सर्व्हिस, खोलीत पोहोचवले जाणारे स्वच्छ जेवण आणि हॉटेलचे वातावरण या सगळ्याच्या तो मोहात पडला होता. या खोलीत त्याने त्याचं विश्व निर्माण केलं होतं. त्याने राजकीय उलथापालथ, आर्थिक बदल, हॉटेलचे नूतनीकरण आणि पिढ्यांचे संक्रमण सगळं या हॉटेलच्या खोलीतून अनुभवलं. या हॉटेलसाठी तो कर्मचाऱ्यांसाठी कायमचा पाहुणा आणि ते कर्मचारीच जणू त्याचे घरातील सदस्य बनले होते. 1957 मध्ये त्याने ‘चेक इन’ केले होते व 2024 मध्ये त्याने ‘चेक आऊट’ केले. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की, 67 वर्षे हॉटेलमध्ये राहिल्यावर त्याला किती बिल आलं असेल. खरंतर हॉटेल व्यवस्थापनाने त्याला अनेक वेळा विशेष दर किंवा सवलती दिल्यात; पण तरीदेखील त्याला प्रचंड बिल आलं. असं सांगितलं जातं की, अंदाजे त्याला 21 कोटींपेक्षा जास्त बिल आलं. या हिशोबाने पाहिलं तर दिवसाला त्याचे रूमचं भाडं हे 9,000 एवढं होतं असा अंदाज आहे. आजच्या काळात ही रक्कम कमी वाटत असेल; पण पूर्वी दर कमी होते, मात्र वाढत्या महागाईमुळे अनेक गोष्टींची भाववाढ झाली आहे.