

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या 'कॅपिटल हिल'मध्ये नुकतेच काही अतिथींचे आगमन झाले, तिथे उपस्थित राजकारण्यांचे लक्ष वेधून घेतले. हे पाहुणे ग्रेट लेक्समधून आलेले 'सी लॅम्प्रे' नावाचे आक्रमक परजीवी मासे होते. खासदारांसोबत फोटो काढताना या माशांनी आपले तीक्ष्ण दात दाखवले, तर एका माशाने थेट मिशिगनचे प्रतिनिधी बिल हायझेंगा यांच्या तळहाताचाच वेध घेतला. सध्या तीव्र राजकीय मतभेदांमुळे विभागलेल्या अमेरिकन संसदेत या एका मुद्द्यावर मात्र डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे; ते म्हणजे, ग्रेट लेक्समधील या जीवघेण्या परजीवी माशांचा नायनाट करणे.
अटलांटिक महासागरातील मूळ रहिवासी असलेला हा 'सी लॅम्प्रे' मासा १८०० च्या दशकात ग्रेट लेक्समध्ये दाखल झाला. हा मासा इतर माशांच्या शरीराला आपल्या सुळक्यांसारख्या दातांनी आणि चोषक तोंडाने जखडून ठेवतो आणि त्यांचे रक्त व आवश्यक द्रव शोषून घेतो. केवळ एका वर्षात एक लॅम्प्रे सुमारे १८ किलो मासे फस्त करतो.
कोरोना साथीच्या काळात लॉकडाऊनमुळे या माशांवर नियंत्रण ठेवणारी रासायनिक मोहीम थंडावली होती. परिणामी, काही भागांत यांची संख्या तब्बल ३००% ने वाढली, ज्यामुळे मासेमारी उद्योगाला जवळपास २ अब्ज डॉलर्सचा फटका बसला. ग्रेट लेक्स फिशरी कमिशनच्या मते, जर या माशांवर नियंत्रण ठेवले नाही, तर अवघ्या पाच वर्षांत येथील अब्जावधी डॉलर्सचा मासेमारी उद्योग आणि ७५ हजार रोजगार नष्ट होऊ शकतात. दरवर्षी सुमारे ९० लाख लॅम्प्रे माशांना मारणे आवश्यक असते. १९५७ मध्ये शोधलेल्या 'टीएफएम' या रसायनामुळे या माशांच्या अळ्यांचा नाश केला जातो. आता 'फिशपास'सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नद्यांमध्येच यांना अडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
‘दुसऱ्या मूनशॉट’ची तयारी
ग्रेट लेक्समध्ये लॅम्प्रे व्यतिरिक्त 'क्वागा' आणि 'झेब्रा मुसळ' यांसारख्या इतर १८६ आक्रमक प्रजातींनी धुमाकूळ घातला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकन संसदेत सेव्ह ग्रेट लेक्स फिश ॲक्ट २०२५ विचारधीन आहे, ज्या अंतर्गत पुढील १० वर्षांसाठी ५०० दशलक्ष डॉलर्सच्या निधीची तरतूद केली जाणार आहे. शास्त्रज्ञ आता या जलचर शत्रूंना रोखण्यासाठी 'दुसऱ्या मूनशॉट' मोहिमेच्या तयारीत आहेत.