

लंडन : ऑस्ट्रियाच्या आकाशातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. येथे आल्प्सच्या पर्वतरांगांवर हवेत उड्डाण करणार्या एका महिला पॅराग्लाइडरला एका छोट्या विमानाने थेट जोरात धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की, महिलेचे पॅराग्लाइडर हवेतच दोन तुकड्यांमध्ये फाटले आणि ती वेगाने जमिनीच्या दिशेने कोसळू लागली. मात्र, अत्यंत मोक्याच्या क्षणी महिलेने कमालीचे प्रसंगावधान दाखवले आणि स्वतःचा इमर्जन्सी (राखीव) पॅराशूट उघडून आपला जीव वाचवला. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, ही संपूर्ण घटना कॅमेर्यात कैद झाली आहे.
ही घटना उत्तर ऑस्ट्रियातील पॅराग्लाइडिंगसाठी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या ‘श्मिटनहोहे’ डोंगराजवळ शनिवारी दुपारी घडली. साल्जबर्ग स्टेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 44 वर्षीय ‘सबरीना’ या एक अनुभवी पॅराग्लाइडर आहेत. त्या आपल्या विंगवर (पॅराग्लाइडरचा पंख) कॅमेरा लावून उड्डाण करत होत्या. त्याच वेळी एक टूरिस्ट विमान अचानक त्यांच्या अत्यंत जवळ आले आणि त्यांच्या पॅराग्लाइडरच्या वरच्या भागाला चिरत पुढे निघून गेले. हे विमान सबरीना यांच्या डोक्यापासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर होते. सबरीना यांच्या कॅमेर्यात रेकॉर्ड झालेल्या ‘फर्स्ट-पर्सन’ फुटेजमध्ये दिसते की, विमानाची धडक बसताच त्यांचे मुख्य विंग मध्यभागातून दोन तुकड्यांत फाटले.
विंग उद्ध्वस्त झाल्यामुळे सबरीना यांचा हवेतील तोल पूर्णपणे गेला आणि त्या ओरडत हवेत वेगाने गोल-गोल फिरत खाली कोसळू लागल्या. पूर्ण नियंत्रण सुटल्यानंतरही त्यांनी हिंमत हारली नाही. खाली कोसळत असतानाच त्यांनी तत्काळ आपल्या जवळील ‘रिझर्व्ह पॅराशूट’ शोधले आणि ते हवेतच उघडले. अपघाताची माहिती मिळताच ऑस्ट्रियाचे पोलिस हेलिकॉप्टरसह घटनास्थळी पोहोचले आणि सबरीना यांना वैद्यकीय तपासणीसाठी जवळच्या विमानतळावर नेण्यात आले. एनबीसी न्यूजच्या रिपोर्टनुसार, या भयानक अपघातानंतरही सुदैवाने कोणाचाही जीव गेला नाही, ही मोठी दिलासादायक बाब आहे. सबरीना इमर्जन्सी पॅराशूटच्या मदतीने सुरक्षितपणे जमिनीवर उतरल्या. दुसरीकडे, विमानाचा 28 वर्षीय पायलट देखील विमानावर नियंत्रण ठेवत ते ‘जेल एम सी’ विमानतळावर सुरक्षितपणे लँड करण्यात यशस्वी ठरला.