

टोकियो : ‘जपान मोबिलिटी शो 2025’ मध्ये टोयोटाची लक्झरी कार कंपनी लेक्सस आणि तिची मूळ कंपनी टोयोटा यांनी त्यांच्या भविष्यातील योजना जगासमोर मांडल्या. वाहनांमध्ये नावीन्यता आणि आरामदायक सोयी कशा आणायच्या, यावर त्यांचे मुख्य लक्ष होते. लेक्ससने टोकियोत एक अनोखी सहा-चाकी ‘एलएस’ कॉन्सेप्ट व्हॅन सादर केली. जास्त जागा आणि सर्वोत्तम आरामदायक सुविधा देण्यासाठी तिची खास रचना करण्यात आली आहे.
लेक्ससची प्रमुख कार ‘एलएस’ मध्ये पूर्वी ‘एस’ चा अर्थ ‘सेडान’ असा होता. परंतु, आता टोयोटाचे अध्यक्ष अकियो टोयोडा यांनी ‘एस’ चा अर्थ बदलून ‘स्पेस’ केला आहे. यामुळे कंपनी आता फक्त सेडानपर्यंत मर्यादित न राहता अधिक मोकळ्या जागा देणार्या गाड्या बनवू इच्छिते, हे दिसून येते. टोयोडा म्हणाले की, लेक्सस आता युरोपियन कार कंपन्यांची नक्कल करणार नाही, तर स्वतःच्या नवीन कल्पना आणि डिझाईन्स घेऊन येईल. लेक्ससच्या नवीन डिझाईनचे दोन मुख्य मंत्र आहेत : ‘शोध घेणे’ आणि ‘कोणाचीही नक्कल न करणे’. कंपनीला विश्वास आहे की, त्यांची ही 6-चाकी कार सुखद, आरामदायक असेल आणि प्रत्येक प्रकारच्या रस्त्यावर सहजतेने धावेल.