Pushkar Camel Fair | पुष्कर मेळ्यात आलेला २५० उंटांचा मालक चर्चेत!

वार्षिक सुमारे ३५ लाख रुपये कमाईचा दावा
Pushkar Camel Fair |
Pushkar Camel Fair | पुष्कर मेळ्यात आलेला २५० उंटांचा मालक चर्चेत!
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : राजस्थानमधील पुष्कर मेळा २०२६ मध्ये एका पशुपालकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तब्बल २५० उंट आणि सुमारे १८ लाख रुपये किमतीची ‘थार’ गाडी यामुळे ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. मोठ्या मिशा, देसी अंदाज आणि उंटांचा मोठा व्यवसाय असलेले हे पशुपालक मोहनजी देवासी ऊर्फ मोहन बा म्हणून ओळखले जातात. त्यांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यातून ते आपल्या उंटांबाबत आणि व्यवसायातील कमाईबाबत माहिती देताना दिसतात.

काही पोस्टमध्ये त्यांच्याकडे २०० मादी उंट असल्याचे म्हटले आहे, तर काही ठिकाणी ही संख्या २५० सांगितली गेली आहे. तसेच ते आपली थार गाडी घेऊन मेळ्यात दाखल झाल्याने तीही उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे. मोहन बा केवळ उंटांची संख्याच सांगत नाहीत, तर त्यातून होणाऱ्या उत्पन्नाचा हिशेबही मांडतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे उंट दररोज सुमारे ३०० लिटर दूध देतात. उंटणीचे दूध साधारणतः ४० रुपये प्रति लिटर दराने विकले जाते. यानुसार एका दिवसात सुमारे १२ हजार रुपयांच्या दुधाची विक्री होते. मात्र, या उत्पन्नातून खर्चाची वजावटही करावी लागते. वाहतूक आणि चाऱ्यावर दररोज सुमारे २ हजार रुपये खर्च होतात, असे ते सांगतात.

या हिशेबाने त्यांच्या हाती दररोज जवळपास १० हजार रुपये शिल्लक राहतात आणि वार्षिक कमाई सुमारे ३५ लाख रुपयांपर्यंत जाते. दरवर्षी ते सुमारे १०० उंट घेऊन पुष्कर मेळ्यात येतात. त्यांच्यासाठी उंट हे केवळ पशुधन नसून उपजीविकेचे मोठे साधन आहे. त्यामुळेच ते उंटांचे संवर्धन व्हावे आणि त्यांच्यासाठी अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, अशी मागणीही करत आहेत. राजस्थान सरकारने उंटांच्या संवर्धनाकडे आणि त्यांच्या गरजांकडे लक्ष द्यायला हवे, असे मोहन बा यांचे म्हणणे आहे. उंटांना चरण्यासाठी पुरेशी जागा मिळावी म्हणून भजनलाल सरकारने काही जंगले उंटांसाठी खुली करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. उंटांसाठी उत्तम कुरणे उपलब्ध झाल्यास पशुपालकांनाही मोठा दिलासा मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.