Overweight Hawk | लठ्ठपणामुळे उडू न शकणारा ससाणा अखेर आकाशात झेपावला!

Overweight Hawk |
Overweight Hawk | लठ्ठपणामुळे उडू न शकणारा ससाणा अखेर आकाशात झेपावला!
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : कधीकाळी 'जास्त वजनामुळे उडू न शकणारा पक्षी' म्हणून गणला गेलेला एक 'रेड-शोल्डर्ड' ससाणा अखेर पुन्हा आकाशात झेपावला आहे. पशुवैद्यकांनी त्याची स्थिती आता केवळ 'किंचित जास्त गुबगुबीत' इतकीच असल्याचे सांगत दिलासा दिला. 'RSHA 26-2599' अशी ओळख असलेला हा पक्षी ज्या केंद्रात निरीक्षणाखाली आणि कडक आहारावर होता, त्या 'साउथवेस्ट व्हर्जिनिया वाइल्डलाइफ सेंटर'ने त्याला पुन्हा निसर्गात मुक्त केल्याची पुष्टी दिली आहे.

या ससाण्याचे वजन जवळपास एक किलोच्या घरात गेल्यानंतर केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्याला दररोज केवळ २० ग्रॅम उंदीर किंवा घुशीचे मांस देण्याचा आहार सुरू केला. या आहारनियंत्रणापूर्वी या ससाण्याने परिसरातील असंख्य कोंबड्या फस्त केल्या होत्या, ज्यामुळे त्याला उड्डाण करणेच अशक्य झाले होते. 'सीबीएस न्यूज'नुसार, 'साउथवेस्ट व्हर्जिनिया वाईल्डलाईफ सेंटर'च्या कॅथरीन मॅकग्राथ यांनी 'अ‍ॅज इट हॅपन्स'च्या निवेदिका निल कोक्सल यांना सांगितले की, "आम्ही अखेर आमच्या या मोठ्या, जाडजूड मादीला मुक्त केले आहे. ती रुग्णालयातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच तयार झाली होती." स्थानिक हायस्कूलच्या बाहेर या ससाण्याची भरारी पाहण्यासाठी डझनभर लोक जमा झाले होते.

या ससाण्याची गोष्ट जगभरात पोहोचली होती आणि या पक्ष्याचे पुढे काय होते, हे जाणून घेण्यात लोकांना मोठी उत्सुकता होती. ससाण्याला मुक्त केल्याबाबत शेजारच्या रहिवाशांना सावध करण्यात आले असून, त्यांनी आपल्या कोंबड्यांची काळजी घ्यावी, असे मॅकग्राथ यांनी सांगितले. मात्र, हा पक्षी पुन्हा कधी संकटात सापडल्यास ओळखता यावा, यासाठी त्याला टॅग लावण्यात आला आहे. महिन्याच्या सुरुवातीला हा ससाणा या केंद्राजवळ आढळून आला होता. त्याला केंद्रात आणल्यानंतर, तो उडू का शकत नव्हता हे शोधण्यासाठी तज्ज्ञांनी त्याच्या जखमा आणि इतर समस्यांची तपासणी केली. इतर सर्व शक्यता नाकारल्यानंतर, ९१० ग्रॅम वजन असलेला हा पक्षी "उडण्यासाठी अजिबातच लायक नसेल इतका जाड" असल्याचे अधिकाऱ्यांनी निश्चित केले. पुढील तपासात असेही समोर आले की, तो मोकळ्या फिरणाऱ्या कोंबड्यांवर ताव मारत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.