

नवी दिल्ली ः आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या सामान्य होत चालल्या आहेत. यामध्ये ‘ओवर थिंकिंग’ म्हणजेच अतिविचार ही एक गंभीर समस्या बनली आहे. या अवस्थेत व्यक्ती एखाद्या गोष्टीचा सतत विचार करत राहतो, ज्यामुळे त्याची मानसिक शांती हरपते आणि त्याच्या कामगिरीवरही परिणाम होतो. ओवर थिंकिंगमध्ये व्यक्ती भूतकाळातील घटना किंवा भविष्यातील चिंता यांचा सतत विचार करतो. यामुळे मन सतत व्यग्र राहते आणि अनेकदा झोप न येणे, नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव अशा समस्या उद्भवू शकतात.
हे टाळण्यासाठी तज्ज्ञांनी काही टिप्स दिलेल्या आहेत. शारीरिक व्यायाम हा मानसिक आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर ठरू शकतो. योग, प्राणायाम किंवा हलके चालणे यामुळे मेंदूचा फोकस शरीराकडे वळतो आणि फालतू विचारांपासून विश्रांती मिळते. यामुळे हॅप्पी हार्मोन्स (डोपामिन, सेरोटोनिन) सुद्धा स्रवत असतात, जे मूड सुधारण्यात मदत करतात. दिवसातून काही मिनिटे बाजूला काढून आपल्या विचारांची, चिंता किंवा योजनांची नोंद डायरीत करणे हे अत्यंत उपयुक्त ठरू शकते. यामुळे मन हलके होते आणि विचारांची गर्दी कमी होते. ओवर थिंकिंगचे मुख्य कारण म्हणजे भूतकाळात रमणे किंवा भविष्याची चिंता करणे. त्यामुळे ‘वर्तमान क्षणात जगण्याचा’ सराव करा. हे मनाला स्थिर ठेवण्यासाठी उपयोगी ठरते. सतत फोन किंवा सोशल मीडियावर वेळ घालवल्यामुळे देखील डोक्यात सतत विचार चालू राहतात. त्यामुळे आठवड्यातून काही वेळ तरी मोबाईल बाजूला ठेवून ‘डिजिटल डिटॉक्स’ करणे आवश्यक आहे. यामुळे मेंदूला विश्रांती मिळते आणि मानसिक शांतता टिकवता येते.