

नवी दिल्ली : विचार करणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु, प्रमाणाबाहेर विचार करणे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. ज्याला आपण ‘ओव्हरथिंकिंग’ म्हणतो, ती सवय तुम्हाला वाटत असेल तितकी साधी नाही. तज्ज्ञांच्या मते, ही सवय तुम्हाला थेट रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात पोहोचवू शकते.
जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट, परिस्थिती किंवा व्यक्तीबद्दल मर्यादेपेक्षा जास्त विचार करू लागता, तेव्हा त्याला ‘ओव्हरथिंकिंग’ म्हणतात. जे लोक भविष्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात किंवा सतत नकारात्मक परिस्थितींचा विचार करतात, त्यांना ही समस्या प्रामुख्याने जाणवते. तज्ज्ञ सांगतात की, ओव्हरथिंकिंगचे रूपांतर हळूहळू ‘पॅनिक अटॅक’ मध्ये होऊ शकते. ही प्रक्रिया तुमच्या हृदयाचे ठोके वाढवते आणि विचारांचे रूपांतर भीतीमध्ये करते. यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. श्वास घेण्यास त्रास होणे, स्नायूंमध्ये कडकपणा येणे, अस्वस्थता आणि छातीत धडधडणे अशी लक्षणे दिसू लागतात. जेव्हा मेंदूला परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याचे वाटते, तेव्हा शरीर ‘फाईट किंवा फ्लाईट’ मोडमध्ये जाते, ज्यामुळे पॅनिक अटॅक येतो आणि रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागते. डॉक्टरांच्या मते, केवळ मानसिक स्थितीच नाही, तर तुमच्या काही सवयीदेखील ओव्हरथिंकिंगला कारणीभूत ठरतात : पुरेशी झोप न घेणे. तसेच चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्सचे अतिसेवन. वेळेवर जेवण न करणे किंवा पोषणाची कमतरता, दीर्घकाळ तणावाखाली असणे.
पुरेशी झोप घ्या : मेंदूला विश्रांती मिळण्यासाठी 7-8 तासांची झोप आवश्यक आहे.
कॅफीनचे प्रमाण कमी करा : चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित ठेवा.
श्वसनाचे व्यायाम : अस्वस्थ वाटल्यास दीर्घ श्वसन करा.
दिनचर्या निश्चित करा : रोजची कामे वेळेवर करा आणि ताजे, गरम अन्न खा, ध्यान करा.
तेलाने मालिश : नसांना आराम देण्यासाठी आयुर्वेदिक तेलाने मालिश (अभ्यंग) करा.
वैद्यकीय मदत : जर विचार थांबत नसतील, तर संकोच न करता तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.