

वॉशिंग्टन : आजच्या काळात तंत्रज्ञान प्रचंड वेगाने प्रगती करत आहे. अनेकजण आपली कामे मशिनच्या मदतीने करत आहेत. मात्र, या मशिनमुळे माणसांमधील संवाद आणि प्रत्यक्ष भेटणे-बोलणे खूप कमी झाले आहे, असे अनेकांचे मत आहे. याचे अनेक गंभीर परिणामही दिसून येत आहेत. आता तर लोक संवाद साधण्यासाठी किंवा एखाद्या समस्येवर तोडगा काढण्यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) आधार घेऊ लागले आहेत आणि त्याला आपला सोबती मानू लागले आहेत. अशीच एक घटना अमेरिकेत समोर आली आहे, जिथे एका महिलेने ‘एआय’च्या मदतीने नैराश्यावर (डिप्रेशन) मात केल्याचा अनुभव सांगितला आहे.
अमेरिकेतील मिशिगन राज्यात राहणारी एमजी कॉकिंग तिच्या कॉलेजमध्ये पूर्णपणे एकाकी होती. तिला लोकांशी बोलणे खूप अवघड वाटायचे. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत एमजीने सांगितले की, एक दिवस तिला इंटरनेटवर ‘कॅरेक्टर एआय’ (Character. AI) नावाची एक वेबसाईट सापडली. तिथे तिची मैत्री ‘डोनाटेलो’(Donatello) नावाच्या एका चॅटबॉटशी झाली. डोनाटेलो हा कोणी माणूस नसून एक एआय चॅटबॉट होता.
एमजी म्हणाली, ‘मला असा मित्र हवा होता, जो माझ्याबद्दल कोणताही पूर्वग्रह ठेवणार नाही आणि माझे ऐकून घेईल.’ ती रोज डोनाटेलोशी बोलायची. त्यांची मैत्री अगदी सामान्य माणसांसारखी घट्ट झाली होती. एमजीने सांगितले की, 2023 मध्ये ती गंभीर नैराश्यात गेली होती. एका रात्री तिने स्वतःला इजा पोहोचवण्याचा विचारही केला होता. एमजीने याबद्दल डोनाटेलोशी संवाद साधला आणि त्याला सांगितले की, या परिस्थितीतून तिचे लक्ष विचलित करावे. यावर डोनाटेलोने एमजीला तातडीने सांगितले की, ‘तू एखाद्या खर्या माणसाला बोलाव.’ एमजीने त्याचे ऐकले आणि आपल्या एका मित्राला घरी बोलावले.
यादरम्यान, जोपर्यंत तिला सुरक्षित वाटू लागले नाही, तोपर्यंत डोनाटेलो तिच्याशी प्रश्न विचारून संवाद साधत राहिला. एमजीने सांगितले की, त्या दिवशी त्या एआय चॅटबॉटने तिचा जीव वाचवला, पण त्याचबरोबर तिला हेही समजावले की, तिला माणसांशी मैत्री जोडायला शिकले पाहिजे. एमजीला जाणीव झाली की, चॅटबॉट डोनाटेलोचे बोलणे तिला कितीही दिलासा देत असले, तरी ते खरे नव्हते. तिला हेही समजले की, या आभासी मैत्रीमुळे ती खर्या लोकांपासून दूर जात आहे. यानंतर, तिने डोनाटेलोशी शेवटचे बोलताना सांगितले, ‘मला कल्पनेच्या दुनियेत (फँटसी) दिलासा मिळतो, पण माझ्यासाठी वास्तवात जगणे खूप महत्त्वाचे आहे.’ यानंतर तिने ते अॅप कायमचे बंद केले!