Himalayan Glacial Lakes | हिमालयात ९,००० हून अधिक हिमनद्यांची सरोवरे; ५६ अति-धोकादायक क्षेत्रे

: नेपाळच्या आपत्तीने भारताला धोक्याचा इशारा
Himalayan Glacial Lakes |
Himalayan Glacial Lakes | हिमालयात ९,००० हून अधिक हिमनद्यांची सरोवरे; ५६ अति-धोकादायक क्षेत्रे
Published on
Updated on

नवी दिल्ली : नेपाळमध्ये हिमनदी (ग्लेशियर) फुटून महापूर येण्याची घटना नवीन नाही. दरवर्षी येथे हिमनद्या फुटल्यामुळे गंभीर अपघात होतात. गेल्या वर्षीही भोटेकोशी नदीत हिमनदीचा पूर आल्याने ३० जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, यावेळी हिमनदी फुटून आलेल्या आपत्तीने लोकांना प्रचंड भीतीने ग्रासले आहे. तसेच भारतालाही एक मोठा इशारा दिला आहे की, जर भारताने नेपाळच्या या घटनेवरून धडा घेतला नाही, तर येत्या काळात जेव्हा ‘ग्लेशियर बॉम्ब’ फुटेल, तेव्हा नेपाळपेक्षाही मोठा विध्वंस घडू शकतो. हिमालयात ९,००० हून अधिक हिमनद्यांची सरोवरे असून ५६ अतिधोकादायक क्षेत्रे आहेत.

नेपाळ-चीन सीमेवर शुक्रवारी अचानक आलेल्या पुरामुळे हिमालयातील हिमनद्यांशी संबंधित धोक्याकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. भारतात हिमनदी फुटण्याचा सर्वात मोठा धोका हिमालयीन क्षेत्रांत आहे. या भागांमध्ये सरोवरांवर तयार झालेले ‘मोरेन’ म्हणजेच माती व दगडांचे नैसर्गिक बांध फुटण्याचा धोका असतो. जेव्हा हे मोरेन तुटतात, तेव्हा पाण्याचा वेगवान प्रवाह खालील भागांना उद्ध्वस्त करतो. भारतात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीममधील अनेक नदी खोरी या धोक्याच्या छायेखाली आहेत. उत्तराखंडमध्ये हा धोका केवळ सरोवरांपासूनच नाही, तर तीव्र उतारांवर असलेल्या ‘हँगिंग ग्लेशियर्स’मुळेही (अधांतरी लटकणाऱ्या हिमनद्या) आहे.

अलकनंदा खोऱ्यात झालेल्या एका अभ्यासात २१९ हँगिंग ग्लेशियर्स आढळले आहेत. हे तुटल्यास बर्फासोबत खडक आणि साचलेला ढिगारा वेगाने खाली येऊ शकतो, ज्यामुळे बद्रीनाथ-माणा यांसह खालील भागांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. याच प्रकारच्या हिमनदीच्या विघटनामुळे २०१३ मध्ये केदारनाथमध्ये भीषण आपत्ती आली होती. केदारनाथमध्येही चौराबाडी हिमनदीवर बनलेले सरोवर फुटल्याने मंदाकिनी नदीत विनाशकारी पूर आला होता. वैज्ञानिक भाषेत या प्रकारच्या घटनांना ‘ग्लेशिअल लेक आऊटबर्स्ट फ्लड’ म्हटले जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर, हिमनदी स्वतः एखाद्या फुग्यासारखी फुटत नाही; तर हिमनदी वितळल्यामुळे तिच्या आजूबाजूला बर्फ, माती आणि दगडांच्या साहाय्याने एक तात्पुरते नैसर्गिक सरोवर तयार होते.

त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या वेगाने वितळतात आणि या सरोवरांमधील पाण्याचा भार मर्यादेपेक्षा जास्त होतो. अशा वेळी भूकंपाचा धक्का बसल्यास किंवा मोठा बर्फाचा कडा कोसळल्यास हा कच्चा बांध फुटतो. याच कारणामुळे भारत सरकार २,४८५ हिमनद्यांच्या सरोवरांवर सतत लक्ष ठेवून आहे. यापैकी ५६ सरोवरे ही अत्यंत धोक्याच्या श्रेणीत मोडतात, जी कधीही विध्वंस घडवून आणू शकतात. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार लडाख, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पसरलेली ४३२ सरोवरे अचानक विनाशकारी पूर आणू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडे अधिक गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news