

न्यूयॉर्क : तुम्ही कधी विचार केला आहे का? की, अनोळखी देशात गेल्यावर तिथली भाषा येत नसताना कोणता शब्द सर्व लोकांना समजेल? तुमचे उत्तर नक्कीच ‘ओके’ असेल! हा छोटासा शब्द केवळ एक शब्द नाही, तर एक सांस्कृतिक प्रतीक बनला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याची सुरुवात एका गमतीतून झाली होती.
‘ओके’ शब्दाचा उगम समजून घेण्यासाठी आपल्याला 1839 सालात जावे लागेल. त्या काळात अमेरिकन वृत्तपत्रांमध्ये मुद्दाम चुकीचे स्पेलिंग आणि मजेशीर संक्षिप्त रूपे वापरण्याचा ट्रेंड होता. याचकाळात ‘बोस्टन मॉर्निंग पोस्ट’ या वृत्तपत्राने एका लेखात ऑल करेक्ट (all correct) अर्थात सर्व काही ठीक याऐवजी गंमतीने ऑल करेक्ट (oll korrect) असे लिहिले आणि त्याचे संक्षिप्त रूप ’o.k’ असे वापरले.
हा शब्द कदाचित विसरला गेला असता, पण 1840 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. उमेदवार मार्टिन व्हॅन ब्युरेन यांना त्यांच्या ‘ओल्ड किंडरहुक’ (Old Kinderhook) या टोपणनावामुळे ओळख मिळाली. त्यांच्या समर्थकांनी ‘OK Club’ स्थापन केला आणि ‘We're OK!’ ही घोषणा दिली. येथूनच ‘OK’ या शब्दाला राजकीय लोकप्रियता मिळाली आणि तो सर्वसामान्यांच्या वापरात आला.
नंतर या शब्दाच्या उत्पत्तीबद्दल अनेक सिद्धांत मांडले गेले, पण ’Oll korrect’ पासूनच त्याची सुरुवात झाल्याचे भाषातज्ज्ञांनी सिद्ध केले. आज ‘OK’, ‘kay’ आणि ’k’ ही तिन्ही रूपे प्रचलित आहेत. एका साध्या गंमतीतून सुरू झालेला हा शब्द आज जागतिक संवादाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.