

नवी दिल्ली : प्रत्येक देशातील लोक अन्य देशांमधील काही स्वादिष्ट खाद्यपदार्थ स्वीकारत असतात. आपल्या देशातही असे पूर्वीपासून घडलेले आहे. चीनमधून आलेले नूडल्स, चाऊमिन, मोमोज असोत किंवा इटलीतून आलेले पिझ्झा, स्पाघेट्टी असोत, आपल्या जीभेवर व स्वयंपाकघरातही आता हे पदार्थ रुळले आहेत. जुन्या जमान्यापासूनच काही मिठायाही भारतात आल्या व इथे रुळल्या. त्यामध्ये गुलाबजामचा समावेश होतो. सण असो, लग्नसराई असो किंवा एखादं गोडसर सेलिब्रेशन, गुलाबजामशिवाय गोडधोड अपूर्णच वाटतं; पण कधी तुम्ही विचार केलाय का, ही चविष्ट मिठाई भारतात कधी आली? ‘गुलाबजाम’ हे नाव कसं पडलं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मिठाई खरंच भारतात जन्मलेली आहे का?
गुलाबजामचा इतिहास आपल्याला थेट इराण आणि तुर्कस्तानसारख्या पश्चिम आशियाई देशांपर्यंत घेऊन जातो. इतिहासकारांच्या मते, याचे मूळ फारसी मिठायांमध्ये सापडते. 13 व्या शतकात पर्शियात (आधुनिक इराण) एक लोकप्रिय मिठाई होती ‘लुकमत अल-कादी’ किंवा ‘लुकमा’. ही मिठाई म्हणजे पिठाच्या लहान गोलगोल गोळ्यांना तुपात तळून, मध किंवा साखरेच्या पाकात बुडवून बनवलेली गोड चव. मुघल साम्राज्याच्या काळात गुलाबजामसारखी मिठाई भारतात दाखल झाली. इथे आल्यावर, भारतीय स्वादानुसार आणि स्थानिक साहित्यांच्या वापरातून याला नवं रूप मिळालं. खवा, मैदा, वेलदोडे अशा घटकांनी हा गोड गोळा खास भारतीय झाला.
याला ‘गुलाबजाम’ हे नाव कसं पडलं? ‘गुलाब’ म्हणजे गुलाबपाण्याचा सुगंधी पाक, ज्यात हा गोळा बुडवला जातो. ‘जाम’ किंवा ‘जामुन’ म्हणजे जांभुळ फळासारखा रंग व आकार, ज्याच्याशी या मिठाईची तुलना होते. म्हणूनच गुलाबाच्या सुगंधाने भरलेलं, जांभळासारखं दिसणारं आणि पाकात बुडालेलं हे गोड गोळ्याचं नाव पडलं, ‘गुलाबजाम’! मुघल काळात याची सुरुवात झाली खरी, पण भारतीय बल्लवाचार्यांनी याला पूर्णतः देशी स्वरूप दिले. आज गुलाबजाम फक्त उत्तर भारतापुरता मर्यादित नाही; तो दक्षिणेपासून पूर्व, पश्चिम आणि संपूर्ण देशभरात लोकप्रिय झाला आहे. हलवायांच्या दुकानांपासून घराघरातल्या स्वयंपाकघरांपर्यंत... गुलाबजामची गोडी सर्वत्र आहे!