

वॉशिंग्टन : पृथ्वीवरील पाण्याचे स्रोत शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक दशकांपासून संशोधन करत आहेत. आतापर्यंतच्या एका लोकप्रिय सिद्धांतानुसार, पृथ्वीच्या निर्मितीनंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात उल्कापातांमुळे पृथ्वीवर पाणी आले आणि महासागर तयार झाले असे मानले जात होते. मात्र, या नव्या संशोधनाने पूर्वीच्या सिद्धांतावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. स्पेस रिझर्व्हेशनने हे नवे संशोधन प्रसिद्ध केले आहे.
उल्कापातांचा वाटा मर्यादित
युनिव्हर्सिटीज स्पेस रिसर्च असोसिएशन आणि युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिकोच्या संशोधकांनी चंद्रावरील मातीच्या नमुन्यांचा (ल्युनार रेगोलिथ) अभ्यास करून असे निष्कर्ष काढले आहेत की, गेल्या 4 अब्ज वर्षांत उल्कापातांद्वारे पृथ्वीवर आलेले पाणी हे पृथ्वीच्या एकूण पाणी साठ्याच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे.
चंद्राच्या मातीचा टाईम मशिनसारखा वापर
पृथ्वीवर टेक्टोनिक हालचाली आणि सततच्या भूगर्भीय प्रक्रियांमुळे जुन्या उल्कापातांचे पुरावे नष्ट झाले आहेत. मात्र, चंद्रावर वातावरण नसल्यामुळे तिथे 4 अब्ज वर्षांपासूनची माहिती ल्युनार रेगोलिथमध्ये (चंद्रावरील माती आणि खडक) सुरक्षित साठवली गेली आहे. संशोधकांनी अपोलो मोहिमेदरम्यान गोळा केलेल्या नमुन्यांवर ट्रिपल ऑक्सिजन आयसोटोप पद्धतीचा वापर करून अभ्यास केला.
या अभ्यासात शास्त्रज्ञांनी ऑक्सिजनच्या आयसोटोप्सचा वापर करून उल्कापातामुळे आलेली सामग्री आणि चंद्रावर झालेली वाष्पीकरणाची प्रक्रिया यातील फरक शोधून काढला. संशोधकांच्या मते, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्राच्या तुलनेत पृथ्वीवर 20 पट अधिक उल्कापात झाले असले तरी, त्यातून मिळालेले पाणी पृथ्वीवरील महासागरांच्या तुलनेत केवळ काही टक्केच आहे. पृथ्वीसाठी उल्कापाताद्वारे मिळालेले पाणी नगण्य असले तरी, चंद्राच्या ध्रुवीय भागांत साठलेले हे पाणी भविष्यातील मानवी मोहिमांसाठी अत्यंत मोलाचे ठरणार आहे. इंधन निर्मिती आणि जीवनावश्यक गरजांसाठी हे स्रोत महत्त्वाचे ठरणार आहेत.