

मेक्सिको : एका मोठ्या आणि वजनदार माशाचा थेट चुरा होईल इतक्या जोराने त्याला धडक देणे ही ऑर्का (किलर व्हेल) माशांमधील शिकार करण्याची एक नवीन आणि अनोखी पद्धत समोर आली आहे. २०२४ आणि २०२५ मध्ये मेक्सिकन पॅसिफिक महासागर आणि कॅलिफोर्नियाच्या आखातात गोताखोरांनी या घटनेचे थरारक व्हिडीओ चित्रीत केले आहेत. ‘फ्रंटियर्स इन इथॉलॉजी’ या नियतकालिकात गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, हे क्रूर वर्तन शिकारीसाठी असू शकते किंवा ऑर्का माशांच्या खेळाचा एक भाग असू शकते. शोधनिबंधाच्या प्रमुख लेखिका आणि सागरी संवर्धन क्षेत्रातील संशोधक कॅथरीन आयर्स यांनी सांगितले की, ‘मी काही वर्षांपूर्वी ही घटना पहिल्यांदा कॅमेऱ्यात कैद केली तेव्हा माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.’