

लंडन : तोंडातील हानीकारक जीवाणू आणि बुरशी (फंगी) स्वादुपिंडाचा कर्करोग (पँक्रियाज कॅन्सर) होण्याचा धोका तिप्पट वाढवू शकतात, असे निष्कर्ष एका नवीन संशोधनातून पुढे आले आहेत. माऊथवॉश आणि लाळेच्या नमुन्यांवर आधारित असलेले हे संशोधन तोंडातील सूक्ष्मजीव आणि कर्करोग यांच्यातील संभाव्य दुव्यावर प्रकाश टाकणारे आहे.
संशोधनातील प्रमुख निष्कर्ष :
तोंडी आरोग्याचा कर्करोगाशी संबंध : न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी केलेल्या सर्वात मोठ्या अभ्यासानुसार, ज्या व्यक्तींच्या तोंडातील आरोग्य चांगले नाही, त्यांना कर्करोगासह इतर अनेक आजारांचा धोका जास्त असतो.
कॅन्डिडा बुरशीचा संबंध : जेएएमए अॅन्कॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात पहिल्यांदाच ‘कॅन्डिडा’ नावाच्या बुरशीचा संबंध स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी जोडला गेला आहे. शरीरावर नैसर्गिकरित्या आढळणारी ही बुरशी, लाळेद्वारे स्वादुपिंडात पोहोचून कर्करोगास कारणीभूत ठरू शकते, असा संशोधकांचा अंदाज आहे.
लाळेचे नमुने तपासले : संशोधकांनी 900 अमेरिकन सहभागींच्या लाळेच्या नमुन्यांचा अभ्यास केला. यापैकी 445 स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या नमुन्यांची तुलना कर्करोग नसलेल्या 445 लोकांच्या नमुन्यांशी करण्यात आली.
धोका वाढवणारे सूक्ष्मजीव : अभ्यासात असे आढळले की, 24 प्रकारचे जीवाणू आणि बुरशी स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका वाढवतात किंवा कमी करतात. यापैकी तीन जीवाणू दात आणि हिरड्यांच्या गंभीर संसर्गाशी संबंधित आहेत. हानिकारक सूक्ष्मजीव कर्करोगाचा धोका तीन पटींनी वाढवतो.
कर्करोगाच्या निदानासाठी नवे साधन?
अभ्यासाचे सह-लेखक प्रोफेसर जियॉन्ग आह्न यांनी सांगितले की, तोंडातील जीवाणू आणि बुरशींच्या प्रकारांचे विश्लेषण करून, कर्करोग तज्ज्ञ स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या तपासणीची सर्वाधिक गरज असलेल्या रुग्णांची ओळख पटवू शकतात. मात्र, संशोधकांनी हे स्पष्ट केले आहे की, हा अभ्यास केवळ कर्करोगाच्या धोक्याशी संबंधित आहे. हा अभ्यास थेट कारण-परिणाम संबंध सिद्ध करत नाही.