कैरो : सध्या बहुतांश भाज्यांसाठी कांद्याचा फोडणीत वापर होतच असतो. जगभरातील अनेक देशांमधील लोकांच्या आहारात कांदा आहे. मात्र, त्याचा वापर सध्याचाच आहे असे नाही. हजारो वर्षांपासून मानवाला कांदा पसंत आहे. काही कांस्य युगातील ठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननातही कांद्याचे अवशेष सापडले आहेत. तीन हजार वर्षांपूर्वी कांद्याची शेतीही होत होती.
इजिप्तमधील पिरॅमिड बनवणारे लोक तीन ते चार हजार वर्षांपूर्वीपासून कांद्याची शेती करीत होते व कांदा हा त्यांच्या रोजच्या आहारात समाविष्ट होता. विशेष म्हणजे प्राचीन इजिप्शियन लोकांसाठी कांदा पूज्यही होता. कांद्याचा गोलाकार आणि तो कापल्यावर त्यामध्ये दिसणारी वर्तुळे यामुळे त्यांना तो स्वर्गीय जीवनाचे प्रतीक वाटत असे. इजिप्तचा राजा रामसेस चतुर्थ याच्या ममीच्या डोळ्यांच्या खोबणीत कांद्याचे अवशेष सापडले होते. याचा अर्थ प्राचीन इजिप्शियन लोक अंत्यसंस्काराच्या विधींमध्येही कांद्याचा वापर करीत असत. प्राचीन ग्रीक लोकांना वाटत असे की कांद्यामुळे रक्ताचे संतुलन साधले जाते. त्यामुळे अनेक खेळाडू आहारात कांद्याचा मोठा वापर करीत असत. रोमन ग्लेडिएटर्स आपल्या त्वचेवर कांद्याचा रस लावत जेणेकरून आपले स्नायू मजबूत बनतील.