बरेली :
बरेली जिल्ह्यातील भोलापूर गावात अवघ्या एक वर्षाच्या मुलाने खेळता खेळता नाग सापाच्या जिवंत पिलाला गिळून टाकले. या घटनेत सापाच्या पिलाला आपला जीव गमवावा लागला तर मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.
घराबाहेर खेळत असताना मुलाने सुमारे पाच ते सहा इंच लांब असलेल्या सापाच्या पिलाला येत असल्याचे पाहून त्याला पकडले आणि चक्क तोंडात टाकले. यामुळे सापही त्या मुलाच्या घशात जाऊ लागला. यामुळे दोघांचाही श्वास गुदमरू लागला. याबद्दल संशय येताच घरातील लोकांनी मुलाजवळ जाऊन पाहिले असता त्याच्या तोंडात सापाच्या पिलाची शेपटी दिसली. मुलाच्या आईने अत्यंत धाडसाने शेपटी धरून पिलाला तोंडाबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत सापाच्या पिलाचा मृत्यू झाला होता.
एखाद्यावेळेस सापाच्या पिलाने दंश केला तर ते मुलाच्या जीवावर बेतू शकते, असा विचार करून त्याला तातडीने नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सोबत सापाच्या मृत पिलालाही आणले होते. डॉक्टरांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुलाची संपूर्ण तपासणी केली. मात्र तपासणीअंती मुलाला पिलाकडून दंश झाला नव्हता. सुमारे दोन तासांनी डॉक्टरांनी मुलाला डिस्चार्ज दिला. या घटनेत केवळ दैव बलवत्तर म्हणून माझ्या मुलाचे प्राण वाचले, असे बाप धर्मपालने सांगितले.