

न्यूयॉर्क : सध्या नाताळचे वारे वाहत असताना सोशल मीडियावर एका अनोख्या प्रयोगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि मेकॅनिक निक याने त्याच्या तब्बल 8.3 दशलक्ष रुपये (सुमारे 1 कोटी रुपये) किमतीच्या शेवरले कॉर्व्हेट या आलिशान कारचा कायापालट चक्क एका चालत्या-फिरत्या ख्रिसमस ट्रीमध्ये केला आहे.
निकने सलग नऊ तास मेहनत करून हिरव्या चिकटपट्टीच्या साहाय्याने आपल्या स्पोर्टस् कारवर 2500 हून अधिक लुकलुकणारे ख्रिसमस दिवे लावले. दिवसा या कारचा लूक थोडा विचित्र दिसत असल्याने नेटकर्यांनी “हे काय करून ठेवले आहे?” अशा स्वरूपाच्या उपरोधिक कमेंटस् केल्या होत्या. मात्र, रात्र होताच जेव्हा ही कार रस्त्यावर उतरली, तेव्हा तिचे द़ृश्य पाहून सर्वांचे डोळे दिपले. एखाद्या फिरत्या ख्रिसमस ट्रीप्रमाणे ही कार झळाळून उठली आणि निकचा हा व्हिडीओ टिकटॉकवर प्रचंड व्हायरल झाला.
कायदेशीर अडचणीत वाढ?
कौतुक होत असले, तरी निक आता कायदेशीर कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. मॅसॅच्युसेटस्च्या कायद्यानुसार, खासगी वाहनांवर फ्लॅशिंग, रोटेटिंग किंवा चमकणारे दिवे लावण्यास सक्त मनाई आहे. असे दिवे फक्त रुग्णवाहिका, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांसाठी राखीव असतात. 2500 दिवे लावून रस्त्यावर कार चालवणे हे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन ठरू शकते, ज्यामुळे निकवर मोठी दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उत्साहाच्या भरात अपघात
असाच एक प्रयत्न दुसर्या एका वाहनप्रेमीने त्याच्या बीएमडब्ल्यू कारसोबत केला. मात्र, त्या उत्साहाचे पर्यवसान अपघातात झाले. बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे ती कार रस्त्यावर आदळली आणि ख्रिसमस सेटअपच्या नादात मोठे नुकसान झाले.