

ओस्लो : एका अशा ठिकाणाची कल्पना करा जिथे ना कोणाचा जन्म होतो, ना कोणावर अंत्यसंस्कार केले जातात. इतकेच नाही, तर घराबाहेर पडताना हातात लोड केलेली रायफल असणे अनिवार्य आहे. एखाद्या हॉलीवूड चित्रपटाची कथा वाटावी, असे हे ठिकाण प्रत्यक्षात अस्तित्वात आहे. उत्तर ध—ुवापासून अवघ्या 1,300 किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘स्वालबार्ड’ या बेटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
स्वालबार्डमधील मुख्य शहर ‘लॉन्गइयरब्येन’ मध्ये 1950 पासून मृतदेह दफन करण्यास बंदी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे येथील ‘परमाफ्रॉस्ट’ (कायमस्वरूपी गोठलेली जमीन). अतिथंडीमुळे येथे मृतदेह कुजत नाहीत. संशोधकांना असे आढळले आहे की, अनेक वर्षांपूर्वीच्या मृतदेहांमध्ये आजही धोकादायक व्हायरस आणि बॅक्टेरिया जिवंत आहेत, ज्यामुळे महामारी पसरू शकते. त्यामुळे कोणी गंभीर आजारी असल्यास त्यांना तातडीने मुख्य नॉर्वेमध्ये हलवले जाते. येथे केवळ मृत्यूवरच नाही, तर मुलाच्या जन्मावरही मर्यादा आहेत. हे ठिकाण अत्यंत दुर्गम असल्याने येथे मोठी रुग्णालये नाहीत.
आपत्कालीन परिस्थितीत माता आणि बालकाच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, म्हणून गरोदर महिलांना प्रसूतीपूर्वी काही आठवडे आधीच नॉर्वेला पाठवले जाते. सुमारे 2,500 लोकसंख्या असलेल्या या बेटावर माणसांपेक्षा जास्त ‘पोलर बीअर’ (पांढरी अस्वले) राहतात. सुरक्षेसाठी शहराच्या सुरक्षित भागाबाहेर जाताना सोबत रायफल ठेवणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. ही रायफल अस्वलांवर हल्ला करण्यासाठी नसून स्वसंरक्षणासाठी वापरली जाते. स्वालबार्डचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील एकमेव ‘व्हिसा फ्री झोन’ आहे.
1920 च्या स्वालबार्ड करारामुळे भारतासह अनेक देशांतील नागरिक येथे व्हिसाशिवाय राहू शकतात आणि काम करू शकतात. मात्र, येथे राहण्यासाठी तुमच्याकडे स्वतःची निवासाची सोय आणि रोजगाराचे साधन असणे आवश्यक आहे. येथेच जगातील प्रसिद्ध ‘ग्लोबल सीड वॉल्ट’ आहे. कोणत्याही जागतिक आपत्तीत किंवा युद्धाच्या परिस्थितीत जगातील पिके नष्ट झाल्यास, शेती पुन्हा सुरू करता यावी, यासाठी येथे जगभरातील विविध पिकांचे बियाणे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.