Omega-3 Fatty Acids | ओमेगा-३ फॅटी ॲसिडचे आरोग्यासाठीचे फायदे

Omega-3 Fatty Acids |
Omega-3 Fatty Acids | ओमेगा-३ फॅटी ॲसिडचे आरोग्यासाठीचे फायदे
Published on: 
Updated on: 

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि बिघडलेल्या आहाराच्या सवयींमुळे आपल्या शरीरात आवश्यक पोषक तत्त्‍वांची कमतरता निर्माण होते. सहसा आपण आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांवर लक्ष केंद्रित करतो, परंतु एका अत्यंत महत्त्वाच्या पोषक तत्त्वाकडे दुर्लक्ष करतो, ते म्हणजे ओमेगा-३ फॅटी ॲसिड. हे एक असे आवश्यक फॅटी ॲसिड आहे, जे आपले हृदय, त्वचा आणि मेंदूचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करते. शरीरातील याची कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने रोजच्या दिनचर्येत या सप्लिमेंटचा समावेश केला जाऊ शकतो. या फॅटी ॲसिडचे लाभ असे :

हृदयाचे आरोग्य सुधारते

ओमेगा-३ फॅटी ॲसिड हे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. हे शरीरातील ट्रायग्लिसराइड्सची (Triglycerides) पातळी कमी करते. याशिवाय रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि धमन्यांमधील (Arteries) सूज कमी करण्यास मदत करते. याच्या नियमित सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.

तल्लख मेंदू आणि उत्तम स्मरणशक्ती

डीएचए (DHA) हा आपल्या मेंदूच्या पेशींचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ओमेगा-३ च्या सेवनाने एकाग्रता, मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती सुधारते. लहान मुलांच्या बौद्धिक विकासापासून ते वाढत्या वयात स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यापर्यंत हे महत्त्वाची भूमिका बजावते.

सांधेदुखी आणि सुजेपासून आराम

ओमेगा-३मध्ये नैसर्गिकरीत्या दाहक-विरोधी (Anti-inflammatory) गुणधर्म असतात. जर एखादी व्यक्ती संधिवात (Arthritis) किंवा सांधेदुखीच्या समस्येने त्रस्त असेल, तर हे सप्लिमेंट फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीरातील सूज कमी होऊन सांध्यांचा कडकपणा (Stiffness) दूर होण्यास मदत होते.

चमकदार आणि तजेलदार त्वचा

जर तुमची त्वचा निस्तेज, कोरडी किंवा वेळेआधीच वयस्क दिसू लागली असेल, तर ओमेगा-३ उपयुक्त ठरू शकते. हे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास, मुरुमांची सूज कमी करण्यास आणि चेहऱ्यावरील सुरकुत्यांची वाढ मंदावण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा तरुण दिसते.

डोळ्यांचे आरोग्य

ओमेगा-३ मधील डीएचए हा डोळ्यांच्या रेटीना घटकाचा मुख्य भाग असतो. शरीरात याची कमतरता निर्माण झाल्यास दृष्टीशी संबंधित समस्या किंवा कोरड्या डोळ्यांची समस्या उद्‌भवू शकते. हे सप्लिमेंट वाढत्या वयानुसार डोळ्यांना होणाऱ्या आजारांचा धोका कमी करते.

मानसिक आरोग्य आणि मूड सुधारतो

हे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचीही काळजी घेते. अनेक अभ्यासांमधून असे समोर आले आहे की, ओमेगा-३ मूड स्थिर ठेवण्यास मदत करते. याच्या सेवनाने चिंता आणि नैराश्य यांसारखी लक्षणे कमी होतात.

गरोदरपण आणि बाळाचा विकास

गरोदरपणात पोटात वाढणाऱ्या बाळाच्या मेंदूच्या आणि डोळ्यांच्या योग्य विकासासाठी डीएचए आवश्यक असते. मात्र, गरोदर महिलांनी कोणतेही सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.

कशामधून मिळते?

जवस, चिया सीड्स, अक्रोड, भोपळ्याच्या बिया आणि तीळ, सोयाबीन आणि मोहरीचे तेल अशा शाकाहारातून तसेच रावस (साल्मन), बांगडा (मॅकरेल), तारली/पेडवे (सार्डिन), सुरमई आणि ट्यूना या माशांमध्ये ओमेगा-३ मुबलक प्रमाणात असते. अंड्यांच्या पिवळ्या बलकातही हे फॅटी ॲसिड आढळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news