

मस्कत : ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांची आणि त्यांच्या विलासी जीवनशैलीची जगभरात चर्चा आहे. अल बु सईद राजवंशाचे वारसदार असलेले सुलतान हैथम यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. त्यामध्ये 4500 कोटी रुपयांची यॉट तसेच अनेक दुर्मीळ मोटारींचा समावेश आहे.
11 ऑक्टोबर 1955 रोजी मस्कतमध्ये जन्मलेल्या हैथम बिन तारिक यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या पेम्ब्रोक कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. 2020 मध्ये माजी सुलतान काबूस यांच्या निधनानंतर, त्यांनी एका सीलबंद लाल लिफाफ्यात वारसदार म्हणून हैथम यांचे नाव लिहून ठेवले होते. त्यानुसार, कोणत्याही वादाशिवाय हैथम बिन तारिक ओमानचे सुलतान बनले. सुलतान हैथम यांच्याकडे जगातील दुसरी सर्वात मोठी सुपरयॉट आहे, जिचे नाव ‘फुल्क अल सलामह’ आहे. 4,500 कोटी रुपये किंमत असलेल्या या यॉटच्या देखभालीसाठी वर्षाला सुमारे 451 कोटी रुपये खर्च केले जातात.
याशिवाय त्यांच्याकडे ‘अल सैद’ नावाची दुसरी आलिशान यॉट देखील आहे, ज्यात खासगी चित्रपटगृह आणि वैद्यकीय कक्ष उपलब्ध आहेत. सुलतान यांच्या ताफ्यात 130 वर्षे जुन्या वाफेवर चालणार्या कारपासून ते जगातील दुर्मीळ फेरारी आणि रोल्स रॉयस गाड्यांचा समावेश आहे. तसेच त्यांच्याकडे मर्सिडीज-मेबॅक आणि बेंटले यांसारख्या महागड्या गाड्याही आहेत. ओमानच्या शाही तबेल्यात 1000 पेक्षा जास्त अस्सल अरबी घोडे आहेत. घोडेस्वारीची ही परंपरा त्यांना वारशाने मिळाली आहे. सुलतान यांच्याकडे सहा भव्य राजवाडे आहेत. यात 200 वर्षे जुना ‘अल आलम पॅलेस’ सर्वाधिक प्रसिद्ध आहे.
सोन्यासारख्या पिवळ्या आणि निळ्या रंगाची छटा असलेला हा राजवाडा सांस्कृतिकद़ृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तसेच 1972 मध्ये बांधलेला पांढर्या संगमरवरी ‘फ्लॅग पॅलेस’ हे त्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. सुलतान आपल्या खास पाहुण्यांना ओमानचे शाही चिन्ह असलेल्या अत्यंत महागड्या ‘रोलेक्स’ घड्याळांची भेट देण्यासाठी ओळखले जातात. सुलतान हैथम यांची पत्नी अहाद बिन्त अब्दुल्ला या ओमानमधील महिला सक्षमीकरणाचे प्रतीक मानल्या जातात. सुलतान यांनी 2021 मध्ये आपला मोठा मुलगा सैयद थेयाजिन याला ‘क्राऊन प्रिन्स’ (उत्तराधिकारी) म्हणून घोषित केले आहे.