ऑस्ट्रेलियामध्ये पृथ्वीवरील सर्वात जुने उल्कापाताचे विवर

ते तब्बल 3.47 अब्ज वर्षे जुने
oldest-meteor-crater-on-earth-discovered-australia
ऑस्ट्रेलियामध्ये पृथ्वीवरील सर्वात जुने उल्कापाताचे विवरPudhari File Photo
Published on
Updated on

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात जुने उल्कापाताने बनलेले क्रेटर म्हणजेच विवर शोधून काढले आहे. ते तब्बल 3.47 अब्ज वर्षे जुने असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या वैज्ञानिक जर्नलमध्ये 6 मार्च रोजी प्रकाशित झालेल्या अभ्यासात ही माहिती देण्यात आली आहे.

या शोधापूर्वी, पृथ्वीवरील सर्वात जुना उल्कापात खळगा 2.2 अब्ज वर्षे जुना असल्याचे मानले जात होते. मात्र, हे नवे सापडलेले क्रेटर यापेक्षा 1.2 अब्ज वर्षे अधिक जुने आहे, असे संशोधक टिम जॉन्सन (पृथ्वी आणि ग्रहशास्त्र विभाग, कर्टिन युनिव्हर्सिटी) यांनी सांगितले. हे क्रेटर पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या पिलबारा भागात सापडले, जे पृथ्वीवरील सर्वात जुन्या खडकांचे घर मानले जाते. संशोधकांना ‘शॅटर कोन्स‘ नावाची शंकूच्या आकाराची खडकांची रचना सापडली. जेव्हा एखादा प्रचंड उल्का पृथ्वीवर आदळतो, तेव्हा त्याच्या प्रचंड दाबामुळे खडकांची विशिष्ट शाखायुक्त फाटलेली रचना तयार होते, जी शंकूच्या आकाराची असते. यामुळेच शास्त्रज्ञांनी या उल्कापाताच्या खळग्याचा शोध लावला. संशोधनानुसार, ही उल्का सुमारे 22,400 मैल प्रति तास (36,000 किमी/तास) वेगाने पृथ्वीवर आदळली होती. त्याच्या परिणामामुळे सुमारे 100 किमी व्यासाचे विवर तयार झाले असण्याची शक्यता आहे, परंतु अधिक संशोधनानंतर याची निश्चित माहिती सांगता येईल. हा उल्कापात जरी विनाशकारी असला, तरी त्याने पृथ्वीवर जीवनाच्या सुरुवातीस महत्त्वाची भूमिका बजावली असण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे. संशोधनाचे मुख्य लेखक क्रिस किर्कलँड यांनी स्पष्ट केले की, ‘उल्कापातामुळे गरम पाण्याचे तलाव आणि सूक्ष्मजीवांसाठी पोषक वातावरण तयार होऊ शकते. त्यामुळे अशा प्राचीन उल्कापातांबाबत अधिक माहिती मिळाल्यास पृथ्वीवरील जीवसृष्टीची सुरुवात कशी झाली, याचा उलगडा होऊ शकतो.‘हा शोध केवळ पृथ्वीवरील सर्वात जुना उल्कापात क्रेटर शोधण्यापुरता मर्यादित नाही, तर तो जीवनाच्या उत्क्रांतीशीही संबंधित असू शकतो. अशा आणखी उल्कापात खळग्यांचा शोध लागल्यास पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या जन्माविषयी नवी द़ृष्टिकोन मिळू शकतो, असे वैज्ञानिकांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news